सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांच्या घरातील ईडीच्या तपासात व्यत्यय आणल्याने आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी ईडीने पिंपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले होते तेव्हा त्यांच्या तपासात अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावानी आणि मुलाने सहकार्य केले नाही, उलट तपासात अडथळे आणून पुरावे नष्ट केले. याच कारणाचा ठपका ठेवत रात्री पिंपरी पोलिसांनी अमरमूल चंदानीच्या दोन्ही भावाना आणि त्याच्या एका मुलाला अटक केली आहे.
अशोक साधुराम मूलचंदानी वय 57वर्ष , मनोहर साधुराम मूलचंदानी वय ६१ वर्ष सागर मनोहर मूलचंदानी वय २६ वर्ष, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याशिवाय आणखी दोन महिलांना नोटीस पाठवून सोडण्यात आले आहे . अमर मूलचंदानी हे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. ईडीने रात्री चौकशी पूर्ण केल्यावर त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती.
काय आहे प्रकरण?
अमर मूलचंदानी सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन आहेत. पिंपरी येथील मिस्त्री पॅलेस या ठिकाणी ते सध्या वास्तव्यास आहेत. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे १२४ कर्जांचं वाटप केल्याचं आणि त्या तून ४०० कोटीं पेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले होते आणि आज ईडीने छापा टाकला होता. रीझर्व्ह बँकेने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेवीदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून पडला आहे.
हे ही वाचा:
आर्थिक तंगीने पाकिस्तान बेजार, आता चलनसाठा आटू लागला
सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली
अखेर मालाडच्या बागेतून ‘टिपू सुलतान’ला पळवून लावले
जामीनावर बाहेर
सेवा विकास बॅंकेच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण २५ शाखा आहेत. या बॅंकेत ठेवेदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी आहेत. याच बॅंकेवर काही दिवसांपूर्वी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने प्रशासक नेमलेला होता. त्यामुळे या कारवाईकडे हजारो ठेवीदारांचं लक्ष लागलं आहे आणि ठेविदारांना मोठा दिलासा मिळेल अशी प्रतीक्षा करत आहेत . अमर मूलचंदानी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळी वकिलांनी विरोध केला. त्यांना जर जामीन मिळाला तर ते मुळ पुरावे नष्ट करतील. शिवाय हा घोटाळा ४०० कोटींचा आहे. त्यामुळे या घोटाळ्याला कर्जदार आणि बँक व्यवस्थापन जबाबदार आहे, असं कोर्टाने सांगितलं होतं. त्यानंतर मात्र त्यांना कोर्टाने जामिनावर सोडलं होतं.अमर मुलचंदानी यांच्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.