झोमॅटो या खाद्यपदार्थ वितरित करणाऱ्या कंपनीत जेवण पोहोचविण्याचे काम करणारा रईस शेख याला एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. शेख हा ४० वर्षीय कर्मचारी एका घरी गेलेला असताना त्याने त्या घरातील मुलीला जवळ ओढून तिचे चुंबन घेतले. या प्रकरणी शेखला अटक करण्यात आली आहे.
१७ सप्टेंबरला ही घटना घडली. रात्री ९ वाजता रईस शेख हा झोमॅटोवर देण्यात आलेली ऑर्डर घेऊन त्या मुलीच्या घरी गेला होता. मुलगी घरी एकटीच होती. इमारतीत शिरल्यानंतर त्याने ती ऑर्डर त्या मुलीकडे दिली आणि पिण्यासाठी पाणी देण्याची विनंती केली. त्यावेळी त्या मजल्यावर आणि अवतीभवती कुणीही नाही हे पाहून पाण्याचा ग्लास घेऊन आलेल्या मुलीचा हात त्याने पकडला. मुलीने हात सोडविण्याचा प्रयत्न केला. पण हात सुटला नाही. तेव्हा रईस शेखने त्या मुलीला जवळ ओढत तिचे दोनवेळा गालाचे चुंबन घेतले. त्यानंतर तो तिला थँक यू म्हणाला. त्या मुलीने मग तात्काळ कोंढवा पोलिस ठाण्याला फोन करून झालेला प्रकार सांगितला.
पोलिस सबइन्स्पेक्टर सचिन खेतमाळी यांनी ही घटना घडल्याचे स्पष्ट केले. शेख याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचेही खेतमाळी म्हणाले. या मुलीने रात्रीच्या जेवणासाठी एक ऑर्डर दिली होती ती घेऊन सदर डिलिव्हरी बॉय आला होता. पण या मुलीचा विनयभंग करून तो पळण्याच्या प्रयत्नात असताना त्या मुलीने आरडाओरडा केला. तेव्हा लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
हे ही वाचा:
“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”
अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध
उत्तरप्रदेशमध्ये भिंत कोसळून चौघांचा मृत्यू
शिवसंवाद यात्रेचे फलित, ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचा धुव्वा…
ही मुलगी पुण्यातील एका इमारतीत भाड्याने राहात आहे. घटना घडल्यावर तिने घरमालकाला ही घटना सांगितली आणि मग पोलिसांना फोन करण्यात आला.
याआधीही पुण्यात अशीच एक घटना घडली होती. खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणारा एक तरुण ८ वर्षाच्या मुलीला त्रास देत असल्याचे समोर आले होते. सदर मुलगी आपल्या घरी जात असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.