गोरेगावमध्ये सदनिकेची विक्री करुन खरेदीदाराला मूळ कागदपत्रे न देता सदनिकेवर गृहकर्ज घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माजी पोलीस कर्मचाऱ्यासह त्याचे कुटुंबिय आणि बँक अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहेत.
गोरेगाव पूर्वेकडील फिल्म सिटी रोड परिसरात राहात असलेल्या ४९ वर्षीय तक्रारदार यांचा रियल इस्टेट व्यवसाय आहे. २०११ मध्ये अंधेरी परिसरात राहात असताना त्यांना एका मित्राच्या ओळखीने गोरेगाव फिल्मसिटी रोड येथे एक सदनिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समजले. तक्रारदार यांनी ही सदनिका बघितली. सदनिका आणि आजूबाजूचा परिसर आवडल्याने तक्रारदार यांनी सदनिका विकत घेण्याचा निर्णय घेतला.
सदनिका पोलीस पत्नी सुमन गिते आणि त्यांचा मुलगा संदिप गिते यांच्या संयुक्त नावावर होती. त्यांनी ही सदनिका ४५ लाखांना विक्री करण्याचे सांगितले. तक्रारदार यांनी रोखीने त्यांच्या खात्यात ४० लाख रुपये भरले. सदनिका विक्रीचा करार नोंदणीकृत केल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांना जुलै २०११ मध्ये पाच लाख रुपये धनादेशाच्या माध्यमातून दिले. गिते कुटुंबियांनी या सदनिकेचा ताबा तक्रारदार यांना दिला. पण, सदनिकेचे शेअर सर्टीिफिकेट आणि मुळ कागदपत्रे देण्यास ते टाळाटाळ करु लागले.
हे ही वाचा:
लाडकी बहीण योजनेवर टीका करणारी मविआ महिलांना देणार ३ हजार
‘पीएम विद्यालक्ष्मी’च्या मदतीने विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होणार
‘राहुल गांधी लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात पण त्यातील पाने मात्र कोरी’
…आणि उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापले!
गिते कुटुंबियांच्या या सोसायटीत तीन सदनिका होत्या. यातील एक सदनिका त्यांनी पूर्वी विकलेली होती. दुसरी सदनिका त्यांनी तक्रारदार यांना विकली. तिसऱ्या सदनिकेत ते राहात होते. सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदनिकेबाबत चर्चा होवून सदनिका तक्रारदार यांच्या होणार असल्याने तक्रारदार हे निवांत होते. पण, वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी गिते कुटुबियांनी तक्रारदार यांना विकलेल्या सदनिकेवर गृह तारण कर्ज घेतले.
सदनिका कोणाच्याही नावे हस्तांतरित न करण्याबाबत तक्रारदार यांना पत्र मिळाले. तक्रारदार यांनी गिते यांना जाब विचारला असता त्यांनी कर्ज फेडून सर्व मुळ कागदपत्रे आणून देण्याचे आश्वासन दिले. पण, त्यांनी वेगवेगळी कारणे देत सदनिकेची मूळ कागदपत्रे देण्यास टाळटाळ सुरु केली. गिते यांनी ३५ लाख रुपये कर्ज घेतले होते. हप्ते चुकविल्याने नोटिसा येऊ लागल्या.
गिते यांनी बाजारभावानुसार ९३ लाख रुपयांत सदनिका परत घेतो असे सांगितले. पण, त्यांनी तेही नाही केले. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने तक्रारदार यांनी दिंडोशी पोलीस ठाणे गाठून सुमन गिते, संदिप गिते आणि देवराम गिते यांच्यासह बनावट कागदपत्रांवर गृहकर्ज मंजूर करुन देणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात तक्रार दिली आहे.