गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे बतावणी करून एका वकीलाला लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला खार पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी साडेतीन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी दोन जणांवर मुंबई, ठाणे आणि नवीमुंबईत ८ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिली आहे.
संदेश दत्ताराम मालाडकर (५१), प्रफुल्ल शंकर मोरे (४६), विकास श्रीधर सुर्वे (३९),चेतन कम्पे गोंडा (३४) आणि दर्शन महेश यागनिक (४३) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या टोळीचे नाव असून या टोळीत आणखी आरोपी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. संदेश आणि प्रफुल्ल हे दोघे या टोळीचे प्रमुख असून त्यांच्यावर मुंबईतील भोईवाडा, मालाड, दहिसर,नवघर तसेच नवीमुंबईतील रबाळे, सीबीडी बेलापूर, खान्डेश्वर आणि ठाण्यातील मानपाडा पोलीस ठाण्यात चोरी, फसवणूक,खंडणी, धमकी आणि जबरी चोरीचे ८ गुन्हे दाखल आहेत.
वांद्रे येथे राहणारे ३५ वर्षीय वकील हे ८ सप्टेंबर रोजी बँकेत पाच लाख रुपयांची रोकड जमा करण्यासाठी गेले होते. खार पश्चिम १६वा रस्ता येथे असलेल्या कॅनरा बँकेच्या बाहेर उभे असलेले तीन जण वकीलाकडे आले व त्यांनी आम्ही गुन्हे शाखेतून आलो आहोत, तुम्हाला आमच्या सोबत गुन्हे शाखेच्या कार्यालयात यावे लागेल असे बोलून तिघांनी वकिलाला एका कार मध्ये बसवले. त्यानंतर त्याच्या जवळची बॅग तपासून ही एवढी रक्कम कुठून आणली असे बोलून वकिलाला सांताक्रूझ वांद्रे परिसरात फिरवून सांताक्रूझ येथे गाडी थांबवून आम्हाला आणखी तीन आरोपींना ताब्यात घ्यायला जायचे असल्याचे सांगून वकीला जवळ असलेली पाच लाख रोकड असलेली बॅग घेऊन वकिलाला गाडीतून बाहेर उतरवून निघून गेले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वकिलाने खार पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.खार पोलिसांनी पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलन गंगाजळीचा नवा उच्चांक!
हिमाचलमध्ये आणखी एक अनधिकृत मशीद; हिंदू संघटनांचा आरोप !
बिहारमध्ये बलात्कार करू पाहणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर नर्सने केले वार !
राहुल गांधींच्या विरोधात दलित समाजाकडून ‘जोडे मारो आंदोलन’
पोलीस उपायुक्त (परिमंडळ ९) राजतिलक रोशन, सहाय्यक पोलिस आयुक्त अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक वैभव काटकर, गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि. दत्ता कोकणे पोउनि. संदीप गवळी आणि पथकाने या टोळीच्या शोधात वांद्रे, खार आणि सांताक्रूझ परिसरातील जवळपास ६० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यातील मुख्य आरोपी संदेश मालाडकर याची खबऱ्यामार्फत ओळख पटविण्यात आली.
खार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि. दत्ता कोकणे, संदीप गवळी आणि पथकाने मालाडकर याचा माग काढून त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदारांची नावे सांगितली. पोलीस पथकाने मुंबई तसेच ठाण्यातील विविध परिसरातून इतर ४ आरोपींना अटक करून त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिली आहे.