भारतीय रेल्वेच्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशातच वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना छत्तीसगडमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी वंदे भारत ट्रेनचे नुकसान करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे.
छत्तीसगडमधील महासमुंदमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली होती. महासमुंदमधील बागबहरा रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. यामुळे ट्रेनच्या C2-10, C4-1, C9-78 या तीन डब्यांच्या काचा फुटल्या. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तपास करत पाच आरोपींना अटक केली आहे. पाचही आरोपी बागबहरा येथील रहिवासी आहेत. शिवकुमार बघेल, देवेंद्र कुमार, जितू पांडे, सोनवणी आणि अर्जुन यादव अशी पाच आरोपींची नावे आहेत. आरपीएफ पोलीस रेल्वे कायदा १९८९ नुसार गुन्हा नोंदवून आरोपींना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आरपीएफ अधिकारी परवीन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन होती जी १६ तारखेपासून धावणार आहे. ही ट्रेन सकाळी ७.१० वाजता महासमुंद येथून निघाली आणि ९ वाजण्याच्या सुमारास बागबहराजवळ काही समाजकंटकांनी चालत्या गाडीवर दगडफेक केली. ट्रेनमध्ये उपस्थित असणाऱ्या रेल्वे पोलिसांनी याची माहिती कळवताच एका पथकाने तातडीने जाऊन तपास केला आणि पाच आरोपींना अटक करण्यात आली. हे पाचही बागबहरा येथील आहेत.”
हे ही वाचा:
कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले; निर्यात शुल्कातही २० टक्के कपात
सुरक्षा दलाकडून जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा
विनेशचा दावा खोटा!; ऑलिम्पिकमध्ये कोणतीही मदत मिळाली नसल्याचा केला होता आरोप
वंदे भारत ट्रेनवर दगडफेक होण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीही अनेक शहरांमध्ये वंदे भारत ट्रेनवर समाजकंटकांकडून दगडफेक झाली आहे. काही दिवसांपूर्वी लखनौहून पाटण्याकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली होती. जुलै महिन्यात गोरखपूरहून लखनौला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवरही दगडफेक झाली होती. यामध्ये अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या.