ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवार, १० ऑगस्ट रोजी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळून लावले आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा रुग्णालयाला भेट दिली. यानंतर रुग्णालयातील कारभार पाहून त्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
गेली अनेक दिवस ठाण्यातील या रुग्णालयाच्या बाबत तक्रारी कानावर येत होत्या. एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत, परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये. काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता, रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो, तळपायाची आग मस्तकात गेली, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
संबंधित महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता. तेथे पोहचलो असता, संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले. मात्र, तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे तरीही तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर पाच तास उपचार करत होते. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांची बोलती बंद झाली.
मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते. तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. या गंभीर रुग्णांना दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो. दिवसभरात या रुग्णालयात पाच रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
हे ही वाचा:
मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मानवतावादी पैलूंवर देखरेखीसाठी समिती
‘भारताला आपल्या नेत्यावर विश्वास आहे’
एअर इंडियाचा नवीन लोगो, नवीन रंगसंगती
देशाची माफी मागा! विरोधकांवर ज्योतिरादित्यांचा घणाघात
दरम्यान, कळवा रुग्णालयाची रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता संपली असून अतिदक्षता विभागातही उपचारासाठी खाटा शिल्लक नाहीत. तसेच जे रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते, असे स्पष्टीकरण देत रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळून लावले आहेत.