छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात रविवार सकाळपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक सुरू होती. यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. यात दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.
बिजापूरचे पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. कारवाई दरम्यान, दोन महिला नक्षलवादी आणि तीन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांची ओळख पटणे बाकी आहे. तसेच अनेक स्वयंचलित शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली असून यात एक SLR रायफल, १२ बोअर रायफल, सिंगल शॉट रायफल, BGL लाँचर आणि इतर शस्त्रे आहेत.”
बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील माडेड पोलिस स्टेशन हद्दीतील बांदेपारा- कोरेंजेड जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबाबत गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलाने मोहीम राबवली यात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या परिसरात शोध मोहीम अद्याप सुरू आहे.
४ जानेवारी रोजी छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते. नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर दक्षिण अबुझमाड येथील जंगलात सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलवादविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक झाली होती. नंतर ६ जानेवारी रोजी राज्याच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुधारित स्फोटक यंत्र (IED) वापरून त्यांचे वाहन उडवून दिल्याने आठ जिल्हा राखीव रक्षक कर्मचारी आणि एक चालक ठार झाले होते. सुरक्षा दल नक्षलविरोधी अभियान आटोपून परतत असताना जिल्ह्यातील बेद्रे-कुटू रोडवर हा स्फोट झाला होता.
हे ही वाचा :
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्व विक्रम मोडले!
महाकुंभात पोहोचल्या स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी, स्वामींनी नवे नाव आणि गोत्रही दिले.
राजमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती उत्साहात साजरी
दरम्यान, केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याची शपथ घेतली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये अजेंडा आजतक येथे आपल्या भाषणात गृहमंत्री अमित शाह म्हणाले, छत्तीसगडमधील फक्त दोन जिल्हे नक्षल प्रभावाखाली आहेत. आणि ते ३१ मार्च २०२३ पर्यंत मुक्त केले जातील.