दहिसर येथे दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानाच्या मालकाची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर दागिन्यांची लूट करून पळून गेलेल्या तीन मारेकऱ्यांना सुरत येथून तर त्यांना मदत करणाऱ्या दोघांना दहिसरमधून अटक करण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
या गुन्ह्यात सुमारे १० लाख रुपयांच्या दागिन्यांची लूट करण्यात आली असली तरी ही हत्या लुटीच्या उद्देशातून झाली नसल्यची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. चिराग इनामदार रावल (२१) आणि अंकित संजय महाडिक (२१) या दोघांना दहिसर येथून तर निखिल चंदेल (२१), उदय बाली (२१) आणि आयुष पांडे (१९) या तिघांना सुरत येथील एका घरातून अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
प्रशांत कारुळकर यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डससह तीन पुरस्कार
१५ जुलैपासून मुंबईत सेरो सर्वेक्षण
अजित पवारांच्या मामाचा कारखाना जप्त
सुरत येथून अटक करण्यात आलेले तिघे मध्यप्रदेश येथील राहणारे असून या तिघांना मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या बंटी पाटीदार याने दहिसर येथील रावळपाडा ओम साईराज ज्वेलर्सचे मालक शैलेंद्र पांडे यांच्या हत्येची सुपारी दिली होती अशी माहिती समोर आली आहे. तर चिराग आणि अंकित यांनी या दोघांना पाटीदार याने तिघांच्या मदतीसाठी तयार केले होते. बुधवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास दहिसर येथील रावळपाडा येथे ही घटना घडली होती.
परिमंडळ १२ चे १० विशेष पथकाने २४ तासात या गुन्ह्याची उकल करून पाच आरोपींना अटक केली असून मुख्य सूत्रधार बंटी पाटीदार हा फरार आहे. त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांच्या चौकशीत त्यांना मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या बंटी पाटीदार याने शैलेंद्र पांडेच्या हत्येसाठी सुपारी दिली होती, तसेच देशी कट्टे आणि काडतुसे देखील त्यानेच दिले होते अशी माहिती दिली आहे.
दुकानात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी गोळ्या झाडा त्यानंतर तुम्हाला काय लूट करायची ती करा, अशी पाटीदारने आम्हाला सूचना दिली होती, त्यांनुसार आम्ही सर्वात आधीच गोळ्या झाडल्या त्यानंतर दागिने लुटूले अशी कबुली अटक करण्यात आलेल्या शुटर यांनी पोलिसांना दिली.
या गोळीबारात ठार झालेला शैलेंद्र पांडे हा मूळचा उत्तरप्रदेश येथे राहणार असून मागील ९ वर्षांपासून मुंबईत तो व्यवसायानिमित्त आला होता. दहिसर येथे दुकान भाड्याने घेऊन तो पत्नी आणि मुलासह दहिसर मधेच राहत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. या घटनेमागे केवळ लूट हेच नसून यामागे आणखी काहीतरी वेगळे कारण असून बंटी पाटीदार याला अटक केल्यानंतर हत्येचे मुख्य कारण समोर येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.