नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे बांगलादेशी नागरिक गेल्या २० ते २५ वर्षांपासून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्याला होते. अटक केलेल्यांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
नवी मुंबईमधील कोपरखैरणे येथील खैरणे गावात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील आणि त्यांच्या पथकाने बोनकोडेमधील संशयित घरावर छापा मारला. यावेळी घरामध्ये तीन महिला आणि एक लहान मुलगी राहत असल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या महिलांकडे इतर ठिकाणी राहण्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांबाबत चौकशी केली असता, त्यांनी जामा मशिदीच्या पाठीमागे असलेल्या शोएब पटेल बिल्डिंगमध्ये बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी एक जोडपे त्यांच्या दोन मुलींसोबत राहत असल्याचे आढळून आले. चारही बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या वयाचा दाखला, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मूळ गावचा रहिवाशी दाखला याबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आढळून आले. मात्र, त्या सर्वांकडे भारतातील आधारकार्ड व पॅनकार्ड आढळून आले.
कारवाईनंतर त्यांच्याजवळ असलेले त्यांचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहे. या बांगलादेशी नागरिकांकडे असलेल्या मोबाईल फोनची तपासणी केली असता, ते इमो अॅपचा तसेच व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडीओ कॉलद्वारे बांगलादेशातील आपल्या नातेवाईकांना संपर्क साधत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोनही जप्त केले आहेत. या चारही बांगलादेशी नागरिकांविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा..
महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ कार्यरत
१९७१ च्या शहीद स्मारकातील पुतळ्यांची तोडफोड
आनंद रंगनाथन, जे.साईदीपक, अमिश त्रिपाठींनी सरकारला लिहिले पत्र; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार!
अटक करण्यात आलेली मायरा अस्लम मलिक (वय ३५ वर्षे) ही १९९५ मध्ये तिच्या आत्यासोबत घुसखोरीच्या मार्गाने भारतात आल्याचे तसेच नसीमा बेगम बक्कम गाझी (वय ४५ वर्षे) हिने २०१० मध्ये भारत-बांगलादेश सीमेवरील बेनापोल-बोनगा सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरीत्या प्रवेश केल्याचे त्यांच्या चौकशीत उघडकीस आले आहे. तर फातिमा फजल्लू खान (वय ४५ वर्षे) आणि फिरोजा शाहदत मुल्ला ऊर्फ फिरोजा अनीश शेख (वय ३४ वर्षे) यांनी २००५ ते २०१० या कालावधीत घुसखोरीच्या मार्गाने बांगलादेशातून भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. तर अनीश असरुद्दीन शेख (वय ३८ वर्षे) याने देखील २००५ ते २०१० या कालावधी त्याच्या बहिणीसोबत घुसखोरीच्या मार्गाने बांगलादेश सीमेवरून अवैधरीत्या भारतात प्रवेश केला आहे.