वसईत सक्रीय असलेल्या एका टोळीला पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले आहे. या टोळीची दरोडे घालण्याची पद्धत वेगळीच होती.
बंद घरांची टाळी तोडण्यासाठी नव्या कोऱ्या करकरती कटावण्या विकत घ्यायच्या, त्यांची पूजा करायची आणि घराची कुलुपे तोडून घर साफ करायचे, अशी कामाची पद्धत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. वसईत ही टोळी सक्रिय होती. पोलिसांनी आता या टोळीतील पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बिहारमधून या टोळीतील सदस्य इथे ठराविक दिवसांसाठी येत आणि चोरी करून पळून जात.
यासंदर्भात पोलिस उपायुक्त प्रदीप गिरधर म्हणाले की, ही टोळी फक्त घरफोड्या करण्यात तरबेज होती. चार-पाच महिन्यांमध्ये एकदा यायचे आणि घरफोडी करून पसार व्हायचे अशी यांच्या कामाची पद्धत होती. पालघर येथील माणिकपूरला जो गुन्हा दाखल झाला होता, त्यात एक महिला घराबाहेर पडलेली असताना दोन तासांतच या टोळीने ते घर फोडले आणि त्या घरातील कपाटातून साडेतीन चार लाखाचे दागिने पळविले.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून या टोळीचा माग काढल्यानंतर कोपरखैरणेला ही टोळी पोहोचल्याचे कळले. तेथील एका झोपडपट्टीत टोळीतील सगळे राहात होते. तिथेच त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
स्पुटनिकच्या तिसऱ्या चाचणीला मंजुरी
टेलिककॉम क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी
‘मोंदीच्या काळात अल्पसंख्याक १०० टक्के सुरक्षित’
बापरे! गेल्यावर्षीपेक्षा यंदा वाघाच्या हल्ल्यातील मृतांची संख्या अधिक…वाचा
हे सगळे बिहारहून येतात. १५-२० दिवस इथे राहतात. या दिवसांत कुठेही जातात आणि घरफोड्या करतात. आताही ते ८-१० दिवसांपूर्वी आले होते. माणिकपूर येथे तीन दरोडे घालण्यात या टोळीचाच हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.