उल्हासनगरमध्ये शुक्रवारी (१७ सप्टेंबर) दुपारी एका तरुणाची भररस्त्यात सहा ते सात जणांच्या टोळीने हत्या केली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. भररस्त्यात केलेल्या या हत्येमुळे उल्हासनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर विठ्ठलवाडी आणि हिललाईन पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये पाच आरोपींना अटक केली आहे. सुशांत गायकवाड असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
आठवडाभरात दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्काराच्या घटनेने हादरलेल्या उल्हासनगरमध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे. सुशांत हा माणेरे येथे रहायला होता. भाईगिरीच्या वर्चस्वातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली. मृत सुशांत गायकवाड आणि मुख्य आरोपी आकाश उर्फ चिंट्या यांची मैत्री होती. दोघांवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. काही काळाने दोघांमध्ये वाद होऊन दुरावा निर्माण झाला होता.
हे ही वाचा:
टी २० वर्ल्डकपनंतर कुंबळे प्रशिक्षकपद स्वीकारणार?
अमेरिकेने मागितली ड्रोन हल्ल्याबाबत माफी
पश्चिम बंगाल पोलिसांना स्थानिकांशी गैरवर्तन महागात पडले
बीकेसी पूल दुर्घटनेवरील चर्चा थांबवण्यासाठी युतीची पुडी सोडली
आकाश आणि सुशांत यांच्यात भांडणे होऊ लागली होती. पूर्वी सुशांत आकाशला धमकी देण्यासाठी आकाशच्या घरी गेला होता. याच रागातून सुशांत दुपारच्या सुमारास बंगलो परिसरात दिसताच आकाश, अमोल उर्फ वांग्या मोरे, यश रुपवते, अवि थोरात आणि एका अल्पवयीन मुलाने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ला करून या सर्वांनी शस्त्रे घटनास्थळी टाकून पळ काढला.
घडलेल्या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुशांत याला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान सुशांतचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली.