राज्यात एका धावत्या ट्रॅव्हल बसवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळेस धावत्या ट्रॅव्हल बसवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ६ वरील तिवसाजवळ रात्री उशिरा एक खासगी प्रवासी बस नागपूरच्या दिशेने चालली होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बोलेरोने खासगी बसच्या ड्रायव्हरच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत. अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्ग ६ वर तिवसा जवळ रात्री उशिरा १२ च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटनाही टळली आहे.
हे ही वाचा:
किर्तीकरांच्या उमेदवारीवरून निरुपम यांच्याकडून उद्धव ठाकरे लक्ष्य !
ताठरपणा गेला, चेहऱ्यावर तणाव, सीबीआयच्या ताब्यात येताच शाहजहान शेखचे बदलले हावभाव!
न्या. ओक म्हणतात, दीप प्रज्वलन, पूजा नको… पण हे न्यायाला धरून आहे काय?
क्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब!
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटेपर्यंत या भागात नाकाबंदी लावली होती. गोळीबारात जखमी झालेल्या प्रवाशांना तिवसा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ६ वरुन दररोज हजारो वाहने जात असतात. या घटनेमुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. गोळीबार व्यक्तीगत कारणातून झाला की, लुटमारीच्या उद्देशाने ते अजून स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.