दिल्लीच्या साकेत न्यायालयात थरार, महिलेवर वकिलानेच झाडल्या गोळ्या

गोळीबाराचा व्हीडिओ व्हायरल, महिला आणि एक वकील जखमी

दिल्लीच्या साकेत न्यायालयात थरार, महिलेवर वकिलानेच झाडल्या गोळ्या

नवी दिल्लीतील साकेत कोर्टात मागे गुंडांकरवी झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता एका महिला वकिलावर निलंबित वकिलानेच गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हीडिओ आता व्हायरल झाला असून त्यामुळे या न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्या महिलेवर गोळीबार करण्यात आला ती ४० वर्षीय महिला असून तिच्यासह आणखी एका वकिलाला गोळी लागली आहे. ज्या निलंबित वकिलाने गोळीबार केला त्याच्याविरोधात फसवणुकीची प्रकरणे आहेत, असे कळते.

दक्षिण दिल्लीचे पोलिस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले की, सकाळी १०.३०च्या सुमारास चार ते पाच गोळ्या या व्यक्तीने झाडल्या. एम. राधा नावाच्या महिलेवर त्याने हा गोळीबार केला. त्यांनी दोन गोळ्या लागल्या आहेत. एक गोळी हातावर लागली असून एक पोटात लागली आहे. त्यांना साकेतमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या दोघांना गोळ्या लागल्या आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सावरकरांची बदनामी करण्याची काँग्रेसची मोहीम

मोदाणी कि पदाणी?

टीका भोवली.. संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पाकिस्तानात विकत आहे, विदेशी शस्त्रांच्या ‘फर्स्ट कॉपी’ अगदी स्वस्तात!

ज्याने या गोळ्या झाडल्या त्याचे नाव कामेश्वर प्रसाद सिंह असे आहे. त्याच्याविरोधात फसवणुकीची प्रकरणे नोंदविली गेल्यानंतर बार कौन्सिलने त्याला निलंबित केले आहे.

पोलिसांनी सांगितले की, कामेश्वरविरोधात ४२० कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. ज्या महिलेला त्याने गोळी मारली तिला त्याने फसविल्याचे समोर आले आहे.

कामेश्वरने या महिलेला २५ लाख दिले होते. त्याला जेव्हा हे पैसे मिळाले नाहीत तेव्हा त्याने तिच्यावर गोळ्या झाडून बदला घेण्याचा प्रयत्न केला. गोळ्या मारल्यानंतर तो पळून गेला. या महिलेने त्याच्याविरोधात जो खटला दाखल केला होता, त्याची साकेत जिल्हा न्यायालयात सुनावणी होती.

सध्या कामेश्वर फरार आहे.पण त्याला पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यानिमित्ताने सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात टीका केली आहे. देशाच्या राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

Exit mobile version