सातरस्ता येथील रिषभ ज्वेलर्स दुकानात पिस्तुल आणि चाकूच्या धाकावर १ कोटी ९३ लाखांच्या लुटीची घटना ताजी असतानाच काळबादेवीतील अंगाडीया व्यावसायिकावर गोळीबार करुन ४७ लाख २७ हजार रुपयांच्या सोन्याची लूट केल्याची घटना सोमवारी रात्री पी. डीमेलो रोडवर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. किरण धनावडे (४७) रा.गिरगाव आणि हारून नूर मोहम्मद मदिया (४५) रा.डोंगरी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
काळबादेवीतील अंगाडीया व्यवसायिक चिराग धंदुकीया (३६) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विमल एअर सर्व्हिस नावाने कुरियर व्यवसाय आहे. नेहमी प्रमाणे सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ते पुतण्याला सोबत घेऊन दुचाकीने ४७ लाख २७ हजार रुपये किंमतीचे सोने घेऊन जात होते. पी. डीमेलो रोडवरुन जात असताना चौघांनी त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आत त्यांनी चिराग आणि पुतण्या यांना मारहाण करून त्यांच्याकडील सोने असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.पुतण्याने त्यांना विरोध केला असता एका लुटारु आरोपीने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीने पुतण्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपींनी दागिन्यांची बॅग घेऊन पळ काढला. भर रस्त्यात गोळीबार करुन करण्यात आलेल्या लुटीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची वर्दी मिळताच स्थानिक पोलिसांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील पुतण्याला तातडीने उपचारांसाठी चर्नीरोडमधील सैफी रुग्णालयात दाखल केले. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी चिराग यांची फिर्याद नोंदवून घेत तीन ते चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला.
हे ही वाचा:
टोरेस विदेशी कंपनीकडून सव्वा लाख भारतीयांची आर्थिक फसवणूक; तिघांना अटक
दिल्लीतील राजघाटावर बनणार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक!
स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते होणार हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे उद्घाटन
पत्रकार हत्या: मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरचे काँग्रेसशी असलेले संबंध लपविण्याचा प्रयत्न
पोलिसांनी गुन्ह्यातील तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने ४७ वर्षीय आरोपीला लोकमान्य टिळक मार्ग परिसरातून ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून गुन्ह्यातील चोरी केलेले १६ लाख ५० हजार रुपयांचे सोने हस्तगत केले आहे. तर, गुन्हे शाखेने समांतर तपास करत किरण धनावडे (४७) रा.गिरगाव आणि हारून नूर मोहम्मद मदिया (४५) रा.डोंगरी या दोन आरोपीला डोंगरीतून अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात गोळीबार झालेल्या अंगाडीया यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी गोळीबार करून चोरीचा कट रचला होता. या कटात पाच आरोपी असल्याचे तपासात उघड झाले असून पोलीस याप्रकरणात आणखी तीन संशयितांचा शोध घेत आहेत.