भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषेत टीका केल्याबद्दल पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपाचे नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग, पुणे येथे वागळे यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
भारतीय दंड संहितेच्या १५३ अ, ५००, ५०५ या कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आता यापुढे पोलिस कशाप्रकारे कारवाई करतात, हे पाहावे लागेल.
हे ही वाचा:
अभिषेक घोसाळकरांची हत्या ही उबाठाअंतर्गत चालणाऱ्या गँगवॉरचे परिणाम!
काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार ९० हजार पगार!
पाकिस्तान्यांनी दहशतवाद्याला नाकारलं; हाफिज सईदच्या मुलाचा दारूण पराभव
हल्दवानीमध्ये दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
सुनील देवधर यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ६ फेब्रुवारीला मी माझ्या कार्यकर्त्यांसह माझ्या कार्यालयात बसलेलो असताना निखिल वागळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे संस्थापक तसेच भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे आढळले होते. त्यावेळी मी वागळे यांची पोस्ट उघडून पाहिली असता त्यात लिहिले होते की, अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी! # मोदी # अडवाणी… वागळे यांनी ही पोस्ट टाकून नरेंद्र मोदी व लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी द्वेष आणि दुष्टतेची भावना निर्माण करत समाजात अशांतता निर्माण केली आहे. शिवाय, माझ्यासारख्या अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. सार्वजनिक शांततेला धक्का पोहोचला आहे. म्हणून माझी वागळे यांच्याविरोधात १५३ अ, ५००, ५०५ या कलमांतर्गत तक्रार आहे.
निखिल वागळे यांच्याकडून सातत्याने अशाप्रकारची विधाने यापूर्वीही केली गेली आहेत. त्यातून त्यांच्यावर याआधीही लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे, त्यांना मारहाणही झाली आहे.