‘अ‍ॅमेझॉन’वर गुन्हा; औषधांची प्रिस्क्रिप्शनविना विक्री

‘अ‍ॅमेझॉन’वर गुन्हा; औषधांची प्रिस्क्रिप्शनविना विक्री

ई-कॉमर्स वेबसाईट ‘अ‍ॅमेझॉन’वर अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा नोंदवला आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीकडून गर्भपाताचे औषध प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाईन विकले जात असल्याचे लक्षात आल्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘अ‍ॅमेझॉन’ च्या पोर्टलवर ‘ए – केअर’ या ब्रॅण्डच्या नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळून आले. या औषधाची मागणी प्रशासनाच्या वतीने केली असता त्यावेळी कोणतेही प्रिस्क्रिप्शन मागितले नाही. तसेच हे औषध चिठ्ठी न देताच कुरियरद्वारे प्राप्त झाले. मात्र, यामध्ये औषध विक्रीचे बिल कंपनीने दिलेले नाही.

त्यानंतर हे औषध ओरिसा येथून पुरवठा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तपासणी केली असता ओरिसा येथील कोणत्याही विक्रेत्याने हे औषध पुरवले नसून त्याच्या औषध विक्री दुकानाचे कागदपत्रे वापरून अन्य व्यक्तीने ‘अ‍ॅमेझॉन’च्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केल्याचे आढळून आले आहे.

हे ही वाचा:

राणा दांपत्याच्या घरात पालिकेला दिसले ‘अनधिकृत’

भारत जर्मनीत हे बंध होणार दृढ

लोकमान्य टिळकांवरच्या आक्षेपांना टिळकांच्या वंशजांचे सडेतोड उत्तर

राणा दाम्पत्यांच्या जामिनाची सुनावणी दोन दिवसांनी

एमपीटी किट हे औषधे सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० व नियमांतर्गत अनुसूची एच प्रवर्गातील औषध असून त्याची विक्री केवळ वैद्यकीय व्यवसायिकाच्या चिठ्ठीवरच करणे बंधनकारक आहे. तसेच वैद्यकीय गर्भपात कायदा, २००२ व नियम, २००३ नुसार सदर औषधाचा वापर अधिकृत आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी व सेवा पुरविणाऱ्याच्या पर्यवेक्षणाखाली करणे बंधनकारक आहे. याचे पालन न झाल्यामुळे ‘अ‍ॅमेझॉन’ ऑनलाइन विक्री पोर्टल व संबंधित विक्रेत्याविरुद्ध वांद्रे येथील खेरवाडी पोलीस भादंसं १८६० व माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० आणि औषधे सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० च्या विविध कलमाखाली अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Exit mobile version