उत्तर प्रदेशात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून काँग्रेस नेते, पत्रकार आणि मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाझियाबाद येथील लोणी पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक समाजात दुफळी माजवून तेढ निर्माण करणारे खोटे ट्विट्स केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
गाजियाबाद मधील लोणी भागात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून अपप्रचार करण्यासाठी पत्रकार राणा अय्यूब, सबा नकवी,अल्ट न्यूजचे संपादक मोहम्मद झुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यांच्या जोडीला काँग्रेस पक्षाचे नेते सलमान निजामी, शमा मोहम्मद आणि मन्सूर उस्मानी यांचादेखील समावेश आहे.
या आरोपींनी धार्मिक भावना भडकावण्याचा दृष्टीनेच मुद्दाम ट्विट्स केली असल्याचा ठपका या एफआयआरमध्ये ठेवण्यात आला आहे. तसेच दिशाभूल करणारी ही ट्विट्स हजारो लोकांनी रिट्विट केल्याचेही हे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. सोमवारी रात्री गाझियाबाद पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून संबंधित घटनेविषयी स्पष्टीकरण देऊनही ही ट्विट्स डिलीट करण्यात न आल्यामुळे पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा :
शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”
मुंबई-पुण्यात ५जी च्या चाचणीला सुरवात
ट्वीटरने कायदेशीर संरक्षण गमावलं, केंद्र सरकारची कारवाई
उल्हासनगर महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजपाकडे
या प्रकरणात ट्विटर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटर विरोधात दाखल करण्यात आलेला भारतातला हा पहिला गुन्हा आहे. भारताच्या नव्या आयटी नियमावलीचे पालन न केल्यामुळे ट्विटर या वेबसाईटचे कायदेशीर कवच काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातही आता भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करता येऊ शकतो. सदर प्रकरणात आक्षेपार्ह ट्विट्सना ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ असा शिक्का न दिल्यामुळे ट्विटर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
५ जून रोजी गाझियाबाद मधील लोणी परिसरात घडलेल्या घटनेत अब्दुल समद नावाच्या एका वयस्कर मुस्लीम गृहस्थावर सहा जणांनी हल्ला केला. या हल्ल्यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओमध्ये या सहा जणांनी समद यांची जबरदस्ती दाढी कापून, त्यांना जय श्री राम म्हणण्यास भाग पाडल्याचे सांगण्यात आले. पण समद यांनी पोलिसात दाखल केलेल्या त्यांच्या तक्रारीत असा कोणताच उल्लेख केलेला नाही. तर या घटनेत कोणताही धार्मिक पैलू नसून हल्लेखोरांनी मध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांचे लोक सामील आहेत.