मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराला आर्थिक रसद पुरवली जात आहे का, हे तपासण्यासाठी आर्थिक दक्षता विभागाने गेल्या सहा महिन्यांत मणिपूरमध्ये झालेल्या २० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या व्यवहारांचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.
१ जानेवारीपासून झालेले २० लाखांहून अधिक किमतीचे आर्थिक व्यवहार दक्षता विभागाकडून तपासले जात आहेत. गेल्या सहा महिन्यांत परदेशातून पाठवलेले पैसे, धर्मादाय संस्थांना दिल्या गेलेल्या मोठ्या किमतीच्या देणग्या हे सर्व व्यवहार तपासले जाणार आहेत,’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
एजन्सीने काही स्थानिक नेत्यांची आणि काही धर्मादाय संस्थांसह व्यक्तींची सुमारे १५० ‘संशयास्पद’ खात्यांवर नजर ठेवली आहे. या खात्यांवर पैशांचे असामान्य व्यवहार झाले आहेत. या १५० खात्यांतून शेजारच्या मिझोरम आणि नागालँड राज्यातील खात्यांमध्येही व्यवहार झाले आहेत. याआधी मनी लाँड्रिंगप्रकरणातील दोन मणिपूरस्थित कंपन्यांच्या व्यवहारांचीही दक्षता विभागाकडून चौकशी सुरू आहे. तसेच, ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगार करणाऱ्या पाच कंपन्यांमध्येही लक्ष घातले जात आहे. यापैकी दोन साइट्स फेब्रुवारीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ब्लॉक केल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये, या मंत्रालयाने १३८ बेटिंग ऍप्स आणि चायनीज लिंक्ससह ९४ कर्ज पुरवठादार ऍप्सवर बंदी घालून त्या ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
मणिपूरमधील संघर्षात एक जवान जखमी
सोमवारी मणिपूरमधील संघर्षात एक जवान जखमी झाला तर, इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात पाच घरे जाळण्यात आली. रविवारी मध्यरात्री कांटो सबल येथून इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील चिंगमांग गावाच्या दिशेने अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला, त्यात एक सैनिक जखमी झाला. त्याला ताबडतोब लीमाखॉंग येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे,’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या असून संयुक्त कारवाई सुरू आहे. तर, लष्करासोबत उडालेल्या चकमकीपूर्वी दहशतवाद्यांनी लीमाखॉंग गावात पाच घरे जाळली.
हे ही वाचा:
ठाकरेंच्या अडचणी वाढणार, कॅगच्या अहवालानंतर एसआयटीची स्थापना
टायटॅनिकचे भग्नावशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बेपत्ता
दर्शना पवारच्या मृत्यूचे कारण समोर
सिक्कीममध्ये पावसाचा तांडव, ३०० पर्यटकांना बाहेर काढण्यात यश
‘हिंसाचार रोखा, अन्यथा परिणामांना सामोरे जा’
मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे तसेच, शस्त्रांसह हल्ला करू नये, असे आवाहन मेईती समाजाला केले आहे. तर, हिंसाचार थांबवा अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा त्यांनी कुकी दंगलखोरांना दिला आहे. रविवारी त्यांनी मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधला. ‘झोरामथांगा हे ईशान्येतील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांना कळवले की, मिझोराममध्ये राहणारे मेईती मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटामुळे घाबरले आहेत. त्यांनी मला काहीही होणार नाही, असे आश्वासन दिले. अनुभवी मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना दोन्ही समुदायांशी संवाद साधण्यास सांगितले. मी त्यांना मिझोराममध्ये राहणाऱ्या मेईतींना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली. त्यांनी सुरक्षेचे आश्वासन दिले आणि मी त्यांना आश्वासन दिले की येथे राहणारे मिझो सुरक्षित असतील.’