मराठीतील गाजलेल्या पाचशे पुस्तकांचे त्यांनी बेकायदेशीरपणे पीडीएफ तयार केले होते. त्यामुळे मराठी ग्रंथव्यवसायाचे मोठे नुकसान झाले.
मराठी ग्रंथ व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान करणाऱ्या या टोळीविरुध्द जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मराठी ग्रंथ व्यवसायाचे नुकसान झाल्याचा आरोप मराठी कादंबरीकार विश्वास पाटील यांनी केला आहे. त्यांनी कॉपीराइट कायद्यांतर्गत शुक्रवारी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने मुख्यमंत्र्यांकडे याबाबत दाद मागितली आहे.
मराठीतील वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, विश्वास पाटील, अब्दुल कलाम, रणजीत देसाई, शिवाजी सावंत तसेच विश्वास नांगरे पाटील या नामंकित व्यक्तींच्या गाजलेल्या पुस्तकांचे पीडीएफ तयार करून ती मोफत वितरीत करणाऱ्या काही टोळ्या कार्यरत आहेत. ह्या टोळ्या राजस्थान, मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांतून काम करतात. बेकायदेशीरपणे पुस्तकांच्या पीडीएफ बनवणे, त्या समाज माध्यमाच्या मदतीने वितरीत करणे, पायरेटेड पुस्तके छापणे हा या टोळ्यांचा उद्योग आहे. त्या संदर्भात पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी तक्रार दिली आहे.
हे ही वाचा:
संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण
अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’
ज्योती देवरेंच्या बदलीवरून चित्रा वाघ आक्रमक
सचिन वाझेवर होणार ओपन हार्ट सर्जरी
ई- पुस्तके, श्राव्य पुस्तके आदींशी स्पर्धा करताना प्रकाशन व्यवसायावर जीएसटीचा अतिरिक्त ताण असताना या व्यवसायाला टाळेबंदीचाही मोठा फटका बसला आहे. प्रकाशकांच्या परवानगी शिवाय पुस्तकांच्या पीडीएफ मोफत उपलब्ध होत असल्याने छापील पुस्तकांचा वाचकवर्ग कमी होऊन प्रकाशन व्यवसायाचे नुकसान होत आहे.
पुस्तकांच्या नक्कल प्रती आणि पीडीएफ तयार करून त्या मोफत वितरीत करण्याचे काम खर्चिक असल्याने यामागे एखादी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. याआधी मुंबई, पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, टोळीचा अजूनही शोध लागलेला नाही. सोमवारी लेखक विश्वास पाटील यांनी पुन्हा एकदा जुहूच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.