मुंबईमधील पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. तृप्ती देवरुखकर असे या महिलेचे नाव असून त्यांच्या तक्रारीवरुन मुलुंड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून प्रवीण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर अशी या पिता पुत्राची नावे आहेत.
मुलुंड पश्चिममध्ये ऑफिससाठी घर पाहायला गेल्यानंतर आपल्याला मराठी असल्याचं सांगत घर नाकारल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर यांनी केला होता. याबाबत सोशल मीडियावर त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला होता आणि तो प्रचंड व्हायरल झाला. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. तेव्हा तृप्ती देवरुखकर यांनी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांच्याविरोधात कलम ३४१, ३२३, ५०४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड पोलिसांनी दोन्ही आरोपींना रात्री ताब्यात घेतले आहे. या सगळ्या प्रकारावर मनसे नेते संदीप नेते यांनी टीका करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “केम छो वरळी” होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हणतात यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
कोल्हापुरात दोन मंडळांमध्ये राडा; दगडफेकीत तीन जखमी
जमीन गहाण टाकून ७५ लाखांच्या घोड्याची खरेदी; सुवर्णपदक विजेत्या घोडेस्वारांची कमाल!
सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!
नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?
प्रकरण काय?
तृप्ती देवरुखकर या त्यांच्या कार्यालयासाठी जागा बघण्यासाठी म्हणून मुलुंडमधील एका इमारतीत गेल्या असतात त्या मराठी आहेत हे समजताच त्यांना जागा देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी ही घटना सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी माणसाचा राजकारणासाठी वापर करणे बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं म्हटलं. नियमावली मागितली तर उलट धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत आपला हात पकडला, पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आला आहे की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की, तुम्हाला सोसायटीमध्ये परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही, तर संताप आहे. आज मला अनुभव आला तो प्रातिनिधीक आहे. अशा किती मराठी माणसांना हा अनुभव आला असेल आणि किती जणांना घरं नाकारली असतील?”