एका निर्दयी पित्याने स्वतःच्या ४ वर्षाच्या मुलाला रेल्वे फलाटावर आपटून ठार केल्याची धक्कादायक घटना हार्बर मार्गावरील सानपाडा रेल्वे स्थानकात घडली. वाशी रेल्वे पोलिसानी या निर्दयी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. पत्नीसोबत झालेल्या पैशांच्या वादातून हे कृत्य केल्याची कबुली या पित्याने दिली आहे.
सकलसिंग पवार असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यात राहणारे पवार यांचे अख्खे कुटुंब काही महिन्यांपूर्वी मुंबईत कामाच्या शोधात आले आहे. नवीमुंबईतील सानपाडा हायवे जवळील उड्डाणपूलाखाली सकलसिंग हा दोन पत्नी आणि ४ वर्षाचा मुलगा प्रशांत, भाऊ आणि भावाचे कुटुंब तसेच गावातील काही कुटुंब राहण्यास होते. मिळेल ते काम करायचे काम नाही मिळाले तर भीक मागून खायचे असे या कुटुंबाचा दररोजचा नित्यक्रम आहे.
रविवारी रात्री सकलसिंग यांची दुसरी पत्नी मेहेर हिच्या सोबत पैशांवरून वाद झाला होता, या भांडणाचा राग सकलसिंग याने ४ वर्षाचा मुलगा प्रशांत याच्यावर काढला व त्याला मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या ४ वर्षाच्या प्रशांतवर भाऊ नकलसिंग याने सरकारी रुग्णालयात उपचार करून आणले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकलसिंग त्याची पत्नी मेहेर आणि मुलगा प्रशांतला घेऊन भीक मागण्यासाठी सानपाडा रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ३/४ वर आले होते. त्या ठिकाणी पुन्हा पतीपत्नीत रात्रीच्या कारणावरून भांडण झाले आणि सकलसिंग याच्या कडेवर असणाऱ्या प्रशांत या ४ वर्षाच्या चिमुरड्याला फलाटावर दोन वेळा आपटले. यामध्ये प्रशांतचा मृत्यु झाला. त्याच अवस्थेत मुलाला उचलून निर्दयी पिता सकलसिंग हा भावाकडे आला आणि त्याने भावाकडे मुलाला सोपवून पोलीस ठाण्यात गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी गेला. दोघे पोलिसांना घेऊन पुलाखाली आले व पोलिसानी जखमी अवस्थेत असणाऱ्या मुलाला रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
हे ही वाचा:
तालिबानचा सर्वेसर्वा हैबतुल्लाह अखुंदजादाचा खून
मुख्यमंत्र्यांचा शहाजोग सल्ला म्हणजे निव्वळ थिल्लरपणा!
बलात्काराच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘ढकल केंद्रा’वर
पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांना सायकल ट्रॅक मात्र हवा
सानपाडा पोलिसांनी फलाटावरील सीसीटीव्ही तपासले असता मुलाला आपटून ठार मारत असल्याचे फुटेज मिळून आले. सानपाडा पोलिसांनी हा गुन्हा वाशी रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला. वाशी पोलीसानी हत्येचा गुन्हा दाखल करून निर्दयी पित्याला अटक केली आहे.