पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादातून एका पित्याने स्वतःच्या तीन चिमुरड्या मुलांना आईस्क्रीममधून विष दिल्याची धक्कादायक घटना पूर्व उपनगरातील मानखुर्द येथे घडली. या घटनेत पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पित्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
आलिशान मोहम्मद अन्सारी (५) असे या विषप्रयोगात मृत्यू झालेल्या अपंग मुलाचे नाव असून अलिना (७) आणि अरमान (अडीज वर्षे) या दोघांवर उपचार सुरू आहे.
हे ही वाचा:
शीख समाज म्हणतो, जम्मू-काश्मीरमध्येही ‘लव्ह जिहाद’ कायदा आणा!
भारतात ‘सबका साथ’वर शिक्कामोर्तब
आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार
आरबीआची चार बड्या सहकारी बँकांवर मोठी कारवाई
नाझीया आणि मोहम्मद अन्सारी या दाम्पत्याची ही तिन्ही मुले आहेत. मानखुर्द परिसरातील साठे नगर येथे राहणाऱ्या या दाम्पत्यात मागील काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. या वादातून मोहम्मद अन्सारी याने पत्नीला मारहाण करून घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडल्यानंतर पत्नीने सायंकाळी स्वयंपाक केला नाही. ररात्री मुले उपाशी असल्यामुळे त्यांनी वडिलांना भूक लागली म्हणून सांगितले. रागाच्या भरात पित्याने दुकानातून आईस्क्रीम आणून त्यावर उंदीर मारण्याचे औषध टाकून मुलांना खायला दिले.
पाच वर्षांचा आलिशान या अपंग मुलाने भुकेच्या तडाख्यात आईस्क्रीम खाल्ली मात्र औषधाचा वास येत असल्यामुळे व चव न आवडल्यामुळे अलिना आणि अरमान या दोघानी आईस्क्रीम अर्धवट खाऊन फेकली. काही वेळाने तिन्ही मुलांना उलट्या सुरू झाल्यामुळे आई नाझीयाने मुलांना नजीकच्या मनपा रुग्णालयात आणले. दरम्यान पाच वर्षांचा आलिशान याचा मृत्यू झाला असून इतर दोन मुलांना डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल दाखल करून घेतले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी आई नाझीया हिने पतीच्या विरुद्ध मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.