ठाण्यातील चरई भागात ३० ऑगस्टला पहाटे एका इमारतीजवळ एक दोन महिन्यांची मुलगी नौपाडा पोलिसांना आढळून आली होती. तिला दुधाची आणि संगोपनाची गरज असल्यामुळे पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करून तिला नेरूळ येथील एका संस्थेत दाखल केले आणि त्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
या प्रकरणात नौपाडा पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणामुळे त्याने मुलीला टाकून दिल्याचे तपासातून समोर आले आहे. बाल कल्याण समितीच्या निर्णयानंतर लवकरच मुलीचा ताबा तिच्या आईला मिळू शकतो.
नालासोपारा भागात हा आरोपी त्याच्या पत्नी आणि दोन मुलींसोबत राहतो. त्याच्या पत्नीला बिहारमधील तिच्या गावी जायचे होते. मात्र त्यास आरोपीचा विरोध होता. ३० ऑगस्टला त्याची पत्नी बिहारला जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात आली असताना आरोपी त्याच्या दोन्ही मुलींसोबत पत्नीच्या मागे आला होता. पत्नी रेल्वेमध्ये बसल्यावर आरोपी चरई येथे आला आणि तेथील एका इमारतीजवळ त्याने दोन महिन्यांच्या मुलीला ठेऊन दिले आणि घरी निघून गेला. पत्नी पुन्हा मुंबईत आली असता मुलगी घरात दिसत नव्हती त्यामुळे त्यांच्यात पुन्हा वाद सुरू होऊ लागले. मुलगी गायब असल्याची माहिती संपूर्ण परिसरात पसरताच ही माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली.
हे ही वाचा:
चॉकलेटमधून आणलेला गांजा पोलिसांनी घेतला ताब्यात
अफगाणिस्तानमध्ये ‘लोकशाही’ची गळचेपी; पत्रकाराला नाक घासायला लावले
बर्लिन, हाँगकाँग, अमेरिकेत गणपतीचे स्वागत होणार ढोल ताशांच्या गजरात!
कोकणात चाकरमान्यांची गर्दी; नोंदणीसाठी खोळंबा
नौपाडा पोलिसांनी मुलीला संस्थेत दाखल करताच इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक व्यक्तीने मुलीला इमारतीच्या परिसरात ठेवल्याचे दिसले. त्यानुसार या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश लामखडे यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याच दरम्यान मुलीचे पालक नालासोपारा येथे राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस मुलीच्या घरी गेले असता त्यांनी मुलीच्या वडिलांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीसोबत झालेल्या भांडणातून त्यांनी हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.