बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान याचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांना चांगलाच महागात पडला आहे. शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी देशभरातून मन्नत बंगल्यावर आलेल्या तब्बल ३० चाहत्यांचे मोबाईल फोन्स चोरीला गेल्याच्या घटना समोर आलेल्या आहे.
याप्रकरणी वांद्रे पोलिसानी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सीसीटीव्ही, इतर कॅमेरा फुटेजच्या मदतीने या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. बॉलिवूड मधील सुपरस्टार शाहरुख खान याचा २ नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा झाला. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी देखील शाहरुख खान याला शुभेच्छा देण्यासाठी देशभरातून शेकडो चाहते त्याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आदल्या दिवशी रात्रीच आले होते.
हे ही वाचा:
किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सोमय्या करणार तक्रार
लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही
‘आळशी माणूस ऑफ द इयर’ शोधायचा असेल तर मातोश्रीवर जा
शाहरुख खानची एक झलक बघता यावी म्हणून चाहत्यांनी मन्नत बंगल्याजवळ एकच गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी शाहरुखच्या चाहत्यांचे मोबाईल फोन, पाकिटे लांबवली. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर परतीच्या वाटेवर असणाऱ्या चाहत्यांना त्यांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याचे लक्षात आले.
या चाहत्यांनी मन्नत बंगल्या वरून थेट वांद्रे पोलीस ठाणे गाठून मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी चाहत्यांनी पोलीस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली. पोलिसानी एकेक करून सर्वांच्या तक्रारी नोंदवून दोन गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्या कडे जवळपास ५० जण तक्रार घेऊन आले होते, त्यापैकी २५ जणांनी मोबाईल चोरीच्या तक्रारी दिलेल्या असून इतरांनी मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या तक्रारी दिल्या असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मोबाईल चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसानी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून लवकरच या चोराना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.