अर्जेंटिनाच्या विजयावर अतिउत्साही चाहत्याचा हवेत गोळीबार, एकजण ठार

अर्जेंटिनाच्या विजयाच्या आनंदला मणिपुरमध्ये गालबोट लागले

अर्जेंटिनाच्या विजयावर अतिउत्साही चाहत्याचा हवेत गोळीबार, एकजण ठार

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विजयाचा जगभरात आनंद साजरा करण्यात आला. यादरम्यान भारतातील मणिपूरमध्ये मात्र या आनंदाला गालबोट लागले आहे. एका अतिउत्साही चाहत्याने हवेत गोळीबार केला आणि ती गोळी एका वृद्ध महिलेला लागली. गोळी लागल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

रविवारी फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सदरम्यान अंतिम सामन्यात अर्जेंटिना संघ विजयी झाला. हा विजय संपूर्ण जगात साजरा केला जातं होता. तर एका अतिउत्साही चाहत्याने हवेत गोळीबार केला. ही घटना मणिपूरच्या इम्फाळ जिल्ह्यात घडली आहे. घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव लैशराम ओंग्बी सलम इबेतो (वय ५०) असे आहे.

घराच्या पहिल्या मजल्यावर महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्य टीव्हीवर फुटबॉल सामना पाहत बसले होते. अर्जेंटिनाचा संघ सामना जिंकल्यानंतर परिसरात जोरदार फटाके वाजवण्याचा आणि गोळीबार केल्यासारखा आवाज ऐकू आला. त्या दरम्यान ही महिला घरात जमिनीवर कोसळलेली कुटुंबातील सदस्यांना आढळली. महिलेच्या पाठीत डाव्या बाजुला खोल जखम झालेली आढळली. शिवाय घराच्या भींतीवर दोन ठिकाणी बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण झालेले आढळले. महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे महिलेला मृत घोषित करण्यात आले.

हे ही वाचा:

कर्जमाफीचे आश्वासन पाळा म्हणत काँग्रेसच्या पदयात्रेत शेतकऱ्यांचे आंदोलन

एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होणार?

लोकायुक्त कायद्याचे शस्त्र विरोधकांना पेलवेल काय?

पाच वर्षेही झाली नाहीत तोवर कोसळला पूल

पोलिसांनी या घटनेबाबत अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. क्रूर हत्येचा निषेध करण्यासाठी सोमवारी नागरिकांनी पोलिस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केले. या घटनेसंदर्भात इम्फाळ जिल्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version