अमेरिका- कॅनडा सीमेवर एक धक्कादायक दुर्घटना घटना घडली आहे. अमेरिकेच्या लगत असलेल्या कॅनडाच्या सीमेवर झालेल्या एका अपघातात एका भारतीय कुटुंबातील चार सदस्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान बाळाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा संबंध मानवी तस्करीशी जोडला जात आहे.
मॅनटोबा रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमर्सन परिसराजवळ कॅनडा-अमेरिका सीमेवर चार मृतदेह सापडले आहेत. ज्यात दोन मृतदेह प्रौढ व्यक्तींचे असून एक किशोरवयीन व्यक्तीचा आणि एक लहान बाळाचा आहे.
अमेरिकेचे सहायक पोलीस आयुक्त जेन मैक्लेची यांनी सांगितले की, मृत्यू झालेले नागरिक भारतातून आले होते आणि कॅनडामधून अमेरिकेच्या सीमेतून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. प्राथमिक तपासानुसार, या सर्वांचा मृत्यू गारठल्याने झाला आहे. चारही मृतदेह सीमेपासून ९ ते १२ मीटरच्या अंतरावर आढळून आले आहे. मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे.
हे ही वाचा:
प्रजासत्ताक संचलनात आदिवासी चित्रकलेचे दर्शन
मुंबईतील भाटिया रूग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग; १५ जखमी
संगीत रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांचे निधन
मुंबई पोलिसांनी गँगस्टर सुरेश पुजारीला केली अटक
पोलिसांच्या माहितीनुसार, हे लोक कोणाच्या तरी मदतीने सीमेच्या पलिकडे जाण्याच्या विचारात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचा गारठून मृत्यू झाला. या परिसरात वारे वेगानं वाहत असून तापमान उणे ३५ अंश सेल्सियसच्या आसपास आहे. फक्त थंडीच नव्हे तर बराच काळ बर्फाळ हवा आणि अंधार यामुळेही त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी अमेरिका आणि कॅनडा सरकारकडून तात्काळ अहवाल मागवला आहे.