‘दोन पाकिस्तानी नागरिक एका टँकरमधून आरडीएक्स घेऊन गोव्याला निघाले आहे, या आशयाचा मुंबई पोलीसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करून मुंबईसह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कांजूरमार्ग येथून अटक केली आहे. टँकर चालकासोबत झालेल्या वादातून टँकर चालकाला त्रास व्हावा म्हणून त्याने हा खोटा कॉल केल्याचे तपासात समोर आले आहे.
निलेश पांडे (४२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कांजूरमार्ग पश्चिम येथे राहणारा निलेश पांडे याच्यावर कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. निलेश पांडे हा ठाण्याहुन मुंबईत येत असताना घोडबंदर रोड येथे एका टँकर चालकाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिल्यामुळे टँकर चालका सोबत त्याचे भांडण झाले होते, त्याने टँकर चालकाचा काही अंतरावर पाठलाग केला परंतु टँकर चालक थांबला नाही.
टँकर चालकाला त्रास देण्यासाठी रविवारी मध्यरात्री निलेशने दारूच्या नशेत मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून टँकरचा क्रमांक सांगून ” या टँकरमधून दोन पाकिस्तानी इसम आरडीएक्स घेऊन गोव्याला निघाले आहे, अशी माहिती देऊन मोबाईल बंद केला. कॉल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ गोव्यातील पोलिसांना सतर्क केले होते. राज्यभरातील पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आणि कॉल करणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला.
हे ही वाचा:
त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाच्या वादाच्या तपासाचा एसआयटी अहवाल एका महिन्यात येणार
चांदेरे फौडेशन, राजमाता जिजाऊ संघ सतेज करंडकाचे मानकरी
हिजाबशिवाय अभिनेत्रीचे पोस्टर; इराणमध्ये चित्रपट महोत्सवावरच बंदी
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी असे म्हटले की,“टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याची माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही गोवा महामार्गावर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांवर नाकाबंदी वाढवली आहे. रविवारी दुपारी १.१५ च्या सुमारास संबंधित टँकर संगमेश्वर तालुक्यात अडवण्यात आला. पडताळणी केली असता,टँकरमध्ये प्लॅस्टिकायझर नावाचे रसायन गुजरातहून गोव्यात एका टँकरमधून घेऊन निघाले होते असे पोलिसांना आढळून आले. टँकर चालकाची चौकशी करण्यात आली आणि काहीही संशयास्पद आढळून आले नाही अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या पथकाने कॉल करणाऱ्या निलेश पांडेचा मोबाईल क्रमांकाच्या आधारे कांजूरमार्ग येथे शोध घेऊन त्याला रविवारी दुपारी अटक करण्यात आली असून त्याचा ताबा आझाद मैदान पोलिसांकडे देण्यात आला आहे.अधिक तपासात निलेश पांडे विरुद्ध कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात अपहरण, हल्ला करणे आणि घरफोडीचे चार गुन्हे दाखल असल्याचे तपासात पोलिसांना आढळून आले.