सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले असून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले आहे.
या प्रकरणी शनिवार, १९ मार्च रोजी पुणे न्यायालयात साक्षीदारासमोर आरोपींची ओळख परेड झाली. यावेळी पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना ओळखले आहे. आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना खून करताना पाहिलं, अशी साक्ष त्यांनी दिली आहे.
या प्रकरणी शनिवारी न्यायालयात निम्मी ओळख परेड झाली असून उर्वरित पुढील ओळख परेड ही २३ मार्चला होणार आहे. याप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर, वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे आरोपी आहेत. यातील संजीव पुनाळेकर वगळता सर्व चार आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते.
हे ही वाचा:
अमित शाहांनी घेतला जम्मू काश्मीर मधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा
टाटा घेऊन येणार नवे डिजिटल पेमेंट ऍप
चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया
काँग्रेसशासित राजस्थानमध्ये महिलेवर बलात्कार झाल्यानंतर राहुल गांधींचा कानाडोळा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी दोन आरोपींनी हत्या केली होती. नरेंद्र दाभोलकर यांची ज्याक्षणी हत्या करण्यात आली त्याचवेळी या प्रकरणातील साक्षीदार हे शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर साफसफाई करीत होते. साफसफाईचे काम झाल्यानंतर ते पुलाच्या डिव्हाईडरवर बसले होते. पुलाजवळील झाडावर एक माकड आल्याने आणि त्यामुळे कावळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या बाजूला पाहिले. तेव्हा त्यांनी दोन जणांना एका व्यक्तीवर गोळीबार करताना पाहिलं. या गोळीबारात ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती व्यक्ती जमीनीवर पडल्याचं त्यांना दिसलं. आरोपी हल्ला करुन पोलीस चौकीच्या बाजूला पळाले होते. त्यानंतर ते दुचाकीवरुन पळून गेले होते.