महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने एक टोळी खंडणी मागत असल्याची घटना उघडकीस आली आहे. राज ठाकरे यांच्या नावाचा वापर करून खंडणी मागणाऱ्या टोळीला मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मराठी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यांच्या चालकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माते युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी मुंबईतील मढ परिसरातल्या एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करून या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केला होता. सुरक्षारक्षकाने याबाबत केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तिघांना अटक केली आहे.
हे ही वाचा:
‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’
ठाण्यात ‘ढाण्या वाघा’चे पोस्टर्स; शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा
उद्धव ठाकरे बकरा, शरद पवार कसाई! सदाभाऊंचा सणसणीत टोला
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. मारत असताना ती त्याला राजसाहेबांना ओळखत नाही का? मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही का? काम कोणासाठी करत आहेस? असे प्रश्नही विचारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आलेल्या उल्लेखावरुन या महिलेचे नाव दिपाली असल्याचे समजून येत आहे.
या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याचे उप- निरीक्षक अनुराग दिक्षीत यांनी माहिती दिली आहे. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातल्या महिलेला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. मात्र ती रात्री आली नाही, म्हणून तिला आता पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.