एका माजी सैनिकाला बदनामीची धमकी देत लुटल्याची घटना घडली आहे. ६५ वर्षीय माजी सैनिकाला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ कॉल करून पावणेचार लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त सैनिकाला मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला होता. व्हिडिओ कॉल उचलल्यानंतर विवस्त्र अवस्थेतील तरुणी बोलत होती. ते पाहताच त्यांनी तत्काळ कॉल बंद केला. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीने फोन केला. गुन्हे शाखेतून पोलिस अधिकारी पांडे बोलत असून, तुमचे अश्लील व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते युट्यूब मॅनेजरकडून डिलीट करून घ्या, असे सांगितले.
यावर विश्वास ठेवून माजी सैनिकाने युट्यूब मॅनेजरला फोन केला. तेव्हा हे काम करण्यासाठी ११ हजार ६०० रुपये भरावे लागतील. त्यापैकी ११ हजार रुपये परत मिळतील, असे सांगण्यात आले. त्यांनी पैसे पाठविल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. पाच वेळा मागणी करून ३ लाख ७४ हजार रुपये उकळले.
हे ही वाचा:
गाडीमध्येच गोळ्या झाडलेल्या भारतीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू!
‘पंतप्रधान मोदी यांनी धीर दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला’
रिंकू सिंहचा विजयी षटकार; परंतु ना त्याला फायदा झाला, ना संघाला
विजयपत सिंघानियांची उद्विग्नता; गौतम सिंघानिया रेमंडला उद्ध्वस्त करतोय!
काही वेळाने संशय आल्याने त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा फोन उचलला गेला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट लोणीकंद पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.