परमबीर सिंग, सचिन वाझे विरोधात खंडणीचा गुन्हा

परमबीर सिंग, सचिन वाझे विरोधात खंडणीचा गुन्हा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग सह सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, सचिन वाझे सह इतर ६ जणांविरुद्ध खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात मिळून परमबीर सिंग यांच्या विरुद्धच्या खंडणीचा हा पाचवा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीसांनी सुमित सिंग उर्फ चिंटू याला अटक केली आहे. या गुन्ह्यातील तक्रारदार हे व्यवसायिक असून यापूर्वी ते मुंबई पोलिसांना प्लाटिक लाठ्या सह अनेक वस्तूंचा पुरवठा करीत होते.

बिमल अग्रवाल असे या तक्रादाराचे नाव आहे. गोरेगाव पश्चिम येथे राहणारे बिमल अग्रवाल यांचे एस.व्ही.रोड येथे बोहो नावाचे रेस्टॉरंट आणि बार आहे. पूर्वी ते मुंबई पोलीस दल, महानगरपालिकांना सामुग्री पुरवण्याचे काम करीत होते. पोलीस लाठ्या, बॉम्ब सूट इत्यादीचा पुरवठा अग्रवाल यांनी केला असल्यामुळे त्याचे पोलीस दलातील अधिकारी यांच्याशी चांगले संबंध होते. सचिन वाझे हा देखील बिमल अग्रवाल यांच्या संपर्कात होता.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये ३ अतिरेक्यांना कंठस्नान

दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये

तालिबानचा ‘या’ प्रांतात पराभव

भारताने बनवली जगातील पहिली डीएनए लस

बिमल अग्रवाल भागीदार असलेल्या बोहो रेस्टॉरंट अँड बारवर कारवाई न करण्यासाठी व हॉटेल सुरळीत चालू ठेवण्यासाठी जानेवारी ते मार्च या महिन्यात सचिन वाझे याने परमबीर सिंग यांच्या नावाखाली ११ लाख ९२ हजाराची बळजबरीने वसुली केल्याचा आरोप बिमल अग्रवाल यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.

कोरोनामुळे ६ महिन्यांच्या कमाईचे नुकसान झाले आहे, व ती नुकसानभरपाई करायला दिवसाला २ कोटीच्या कलेक्शन टार्गेट एक नंबरने दिले आहे, असे सचिन वाझेने बिमल अग्रवाल या तक्रादाराला सांगून मुंबईतील बार व्यवसायिकाकडून वसुलीसाठी मदत कर नाहीतर तुझाही धंदा चालू देणार नाही अशी धमकी देखील वाजेने दिल्याचे अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीसानी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे, खाजगी इसम सुमित सिंग उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंग उर्फ बबलू आणि रियाज भाटी या सहा जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमित सिंग उर्फ चिंटू याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

प्रकरणाचा तपास सीआयडीकडे?
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंग सह इतर पोलिसांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपासासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्यात आली होती. या एसआयटीत मुंबई गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यातील अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती.
मात्र राज्य शासनाच्या गृहविभागाने हे प्रकरण तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सोपवण्यात आले आहे. परमबीर सिंग आणि इतराविरुद्ध दाखल झालेला. गोरेगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा तसेच ठाण्यात दाखल झालेले देखील सीआयडीकडे सोपवण्याची शक्यता आहे.

Exit mobile version