मुंबईतील घाटकोपरमध्ये नुकतेच एका व्यावसायिकाला फोनवरून धमकीचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील या व्यावसायिकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीकडून खंडणीसाठी धमकीचे कॉल आल्याची तक्रार दाखल केलेली आहे.
घाटकोपरमधील एका व्यावसायिकाने गेल्या आठवड्यात ही तक्रार दाखल केलेली आहे. दाऊद टोळीच्या गुंडाकडून हे फोन असल्याची तक्रार त्याने दाखल केलेली आहे. छोटा शकील टोळीमधील फहीम मचमचकडून धमकीचे फोन या व्यावसायिकाला येत होते असे त्याचे म्हणणे आहे. पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये लोकांना धमकावणे व खंडणी देण्यासंदर्भात आयपीसी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आणि या प्रकरणातील अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
मुंबईतील इमारत कोसळण्याच्या घटनांसाठी अग्निशमन दलाला ३ हजार कॉल
जोकोविच सितसी’पास’; १९ वे ग्रँडस्लॅम जिंकले
१२५व्या वर्षी त्यांनी घेतली लस!
गुन्हे शाखेच्या संबंधित अधिकारी यांनी या घटनेची पुष्टी केलेली आहे. परंतु घडलेल्या घटनेबद्दल अधिक कुणीच काहीही बोलण्यास तयार नाही. व्यावसायिकाच्या जीविताला धोका ठरू शकतो म्हणून पोलिसांनी घडलेल्या प्रकरणावर मौन बाळगणे पसंत केले. केवळ तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हा फोन नक्की खंडणीसाठी होता की अन्य कारणांसाठी होता याचा पोलिसांतर्फे आता शोध घेतला जात आहे. फोनच्या हेतूमागे मालमत्तेचे वादही असू शकतात असा पोलिसांचा अंदाज आहे. परंतु हा दूरध्वनी बाहेरच्या देशातून होता. त्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झालेल्या आहेत. रेकॉर्ड केलेला ऑडिओ कॉल पोलिसांकडे असलेल्या फहीमच्या ध्वनी नमुन्यांशी जुळत नाही. त्यामुळेच आता हा आलेला कॉल खरा होता का याबद्दलच पोलिसांना शंका येऊ लागलेली आहे. किंवा स्थानिक गुन्हेगार पैसे मिळवण्याच्या हेतूने हे असे फोन करीत असावेत असाही एक कयास लावण्यात येत आहे.