मुंबईतील मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात एक्सपायरी डेटची सौंदर्य प्रसाधने संगणकाच्या मदतीने डेट बदलून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब गुन्हे शाखेच्या कारवाईत समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत क्रॉफर्ड मार्केट, दाणा बाजार, कांदिवली आणि घाटकोपर या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे एक्सपायरी डेटचे सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.
जप्त करण्यात आलेली सौंदर्य प्रसाधने एक्सपायरी डेट संपलेली परदेशातून आलेली असल्याची माहिती समोर आलेली असून ही एक्सपायरी झालेली सौदर्य प्रसाधने मुंबई, ठाण्यातील ब्युटी पार्लर, सलोन येथे वापरली जात असून त्यांची विक्री मेडिकल स्टोर्स आणि इतर बड्या दुकानांमध्ये केली जात असल्याचे समोर आले आहे.
गोरेगाव येथील ‘नॅशनल इम्पेक्स’ आणि ‘एम. एस. इंटरनॅशनल’ या कॉसमेटीक आणि ब्युटी प्रॉडक्टच्या कंपनी दाणाबंदर व क्रॉफड मार्केट या ठिकाणी परदेशातील वैधता संपलेले ब्युटी प्रोडक्टस् वर कॉम्युटरच्या सहाय्याने नवीन वैधता टाकून त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ब्युटी शॉपस् मध्ये कॉसमॅटीक्स् प्रोडक्टस् विक्री करतात आणि सामान्य ग्राहकांची फसवणुक करतात, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष- ११, कक्ष – १२ व कक्ष- ८ मधील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तीन पथके तयार करण्यात आली होती.
या पथकांनी एकाच वेळी मुंबई शहरात गोरेगांव, कॉफर्ड मार्केट व दाणा बंदर परिसरात छापे टाकून तेथील सात गोडाऊन मधील माल तपासला असता त्यामध्ये वैधता संपलेली कॉस्मॅटिक, कलर झोन, पर्मनंट हेअर कलर, ग्लॅमर पर्मनन्ट हेअर कलर, बीओवूमेन प्रोफेशनल हेअर कलर इत्यादी प्रोडक्ट असा एकूण ३ कोटी २८ लाख ७ हजार रुपयाचा माल सापडला. त्याच्यावर संपलेली वैधता खोडून संगणकाच्या साहायाने वैधता वाढविण्यात आल्याचे समोर आले.
वैधता संपलेल्या सौन्दर्य प्रसाधनाचे वैधता वाढवून हे सौंदर्य प्रसाधने कॉफर्ड मार्केट, दी ब्युटी शॉप, ओम टॉवर्स, एस. व्ही. रोड, कांदिवली (प), फर्स्ट ब्युटी, एम. जी रोड, निर्मल कुंज, घाटकोपर (पु) या ठिकाणी विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. क्रॉफर्ड मार्केट येथील गोडाऊनमधील माल विक्री करून मिळालेले १३ लाख १९ हजार रोख व १४ हार्डडिस्क, दोन मोबाईल व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा:
नवरात्र २०२२: सप्तशृंगी गडावर, देवीचा जागर
सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला माजी खासदार बॅ. नाथ पै यांचे नाव
मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएफआय संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी
जप्त करण्यात आलेल्या सौंदर्य प्रसाधनाची वैधता संपलेली असताना त्यांची संगणकाद्वारे वैधता वाढवल्याप्रकरणी गोडाऊनचा व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे. गोडाऊनचा तसेच ब्युटी शॉपचा मालक याकुब उस्मान कापडिया (७८) याला नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे. गुन्हयाचा पुढील तपास कक्ष – ११ करीत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला किल्ला कोर्ट, येथे हजर केले असता त्यांना न्यायालयाने त्याला १ ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.