कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक महाविद्यालये बंदच होती. या बंद महाविद्यालयांचा फायदा चोरांनी घेतला हे आता निदर्शनास आलेले आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील जे. जे. इन्स्टिट्यूट अप्लाइड आर्ट्समध्ये चोरी झाल्याचे आता समोर आलेले आहे. महाविद्यालयाच्या छायाचित्रण विभागामधून काही कॅमेरे आणि लेन्स चोरी झाल्या आहेत. तसेच महागड्या लेन्सही चोरीला गेल्या आहेत. यासंदर्भात आता आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. छायाचित्रण विभागातील चोरी ही नेमकी कधी झाली याची कुणालाच माहिती नव्हती.
मुंबई महापालिकेतर्फे अनेक महाविद्यालयांमध्ये विलगीकरण सेंटर सुरू करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी हे विलगीकरण बंद करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरुस्ती तसेच नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे. काम सुरू असतानाच छायाचित्रण विभागातील चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा:
मेक इन इंडिया अंतर्गत होणार ११४ लढाऊ विमानांची खरेदी
मुकेश अंबानी यांचे ७-इलेव्हन लवकरच मुंबईत
आर्यन खान आता एक रात्र राहणार एनसीबी कोठडीत
हे काम पाहण्यासाठी छायाचित्रण विभाग प्रमुख त्या विभागात गेले होते. त्यावेळी आतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तेव्हा बारकाईने सर्व गोष्टींची पाहणी केल्यानंतर सदर ठिकाणी चोरी झाल्याचे लक्षात आलेले आहे. छायाचित्रण विभागामधील काही कॅमेरे, लेन्स तसेच इतर अनेक महत्त्वाच्या वस्तू गायब झाल्याचे लक्षात आले. ही चोरी करण्यासाठी छायाचित्रण विभागाच्या खिडक्या तोडण्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळेच ही चोरी झाल्याचे लक्षात येताच या छायाचित्रण विभागप्रमुखांनी लगेचच आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
झालेल्या घटनेचा आता पोलिसांतर्फे शोध सुरु करण्यात आलेला आहे. यामध्ये आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच इतर प्राथमिक पुरावे शोधणे सुरु झाले आहे.