केवळ शंभर रुपयांसाठी केला खून

केवळ शंभर रुपयांसाठी केला खून

ओरिसाच्या झारसुगुडा या भागात थरकाप उडवणारी घटना घडली असून अवघे १०० रुपये द्यायला नकार दिल्यामुळे एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. धुरबा राज नायक असे मृत व्यक्तीचे नाव आहे. धुरबा नायक हे निवृत्त प्राध्यापक असून ते संबलपूर विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू राहिले होते.

धुरबा राज नायक हे ओरिसातल्या झारसुगुडा जिल्ह्यातील कुआरमल या गावी वास्तव्यास होते. रविवारी गावातील एक मद्यपी त्यांच्या घरी आला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या माणसाने त्यांच्याकडे शंभर रुपयांची मागणी केली. पण प्रोफेसर धुरबा राज नायक यांनी हे पैसे देण्यास नकार दिला. दारुच्या नशेत असलेल्या त्या माणसाने नायक यांच्याकडे पैशाचा रेटा लावून धरला. पण नायक हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. अखेर नशेत असलेल्या त्या माणसाने संताप अनावर होऊन त्याच्या जवळच्या कुऱ्हाडीने नायक यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यातून स्वतःला सावरायला नायक यांना वेळच मिळाला नाही. वृद्ध नायक हे या हल्ल्यात जखमी झाले असून जागीच त्यांचा मृत्यूही झाला. नायक यांची हत्या केल्यानंतर तो मद्यपी फरार झाला.

हे ही वाचा:

इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचा विषय

मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खातं मिळालं नाही

जपानमध्ये जे ‘झेन’ आहे, तेच भारतात ‘ध्यान’ आहे : पंतप्रधान मोदी

रेल्वे टीसीने पकडलेला तरुण म्हणतो, जगायचं कसं?

या घटनेची माहिती मिळताच झारसुगुडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि लगेचच त्यांनी आपले तपास कार्य सुरू केले. पोलिसांच्या तपास कार्याला यश मिळाले. त्यांनी या आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. झारसुगुडा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बी. सी. दास यांनी या साऱ्या प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली. यावेळी त्यांनी केवळ शंभर रुपये द्यायला नकार दिला म्हणून प्रोफेसर नायक यांची हत्या करण्यात आल्याचे सांगितले.

Exit mobile version