संतप्त स्वभावाच्या सेवानिवृत्त पोलिसाने मुलांनाच गोळ्या घातल्या

संतप्त स्वभावाच्या सेवानिवृत्त पोलिसाने मुलांनाच गोळ्या घातल्या

७० वर्षीय सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या दोन मुलांवर परवानाधारक रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील ऐरोली येथे सोमवारी रात्री घडली. या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाला असून एकावर उपचार सुरू असल्याची माहिती रबाळे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी रबाळे पोलीसानी खुनाचा गुन्हा दाखल करून खुनी पित्याला रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे. हा गोळीबार कौटुंबिक वादातून झाला असल्याची प्राथमिक तपासावरून समोर येत आहे.

भगवान पाटील (७०) असे स्वतःच्या मुलांवर गोळीबार करणाऱ्या पित्याचे नाव आहे. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ३ येथील रो-हाऊस मध्ये लहान मुलगा सुजय याच्यासोबत राहात होते. भगवान पाटील हे नवी मुंबई पोलीस दलातून १२ वर्षांपूर्वी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त झाले होते. भगवान पाटील हे तापट स्वभावाचे असल्यामुळे त्यांचा मोठा मुलगा विजय हा पत्नीसह वसई येथे राहण्यास होता.

हे ही वाचा:

नागपुरमध्ये आशा वर्कर्सचे आंदोलन सुरु

अयोध्येतील राम मंदिरासाठी राजस्थानातील गुलाबी दगडाच्या खाणकामाला सुरूवात

फ्रंटलाइन वर्कर परिचारिका का जात आहेत आंदोलनावर?

शिवसेना आमदाराच्या स्टंटबाजीमुळे कंत्राटदाराचा जीव धोक्यात?

सोमवारी भगवान पाटील यांनी मोठा मुलगा विजय याला फोन करून ऐरोली येथे घरी बोलावून घेतले होते. वडील तापट आणि भांडखोर स्वभावाचे असल्यामुळे दोन्ही मुले त्याच्यासोबत कधीच वाद घालत नव्हते. सोमवारी रात्री भगवान पाटील हे मद्यधुंद अवस्थेत असतांना त्यांनी घरातील चार चाकी वाहनाच्या हप्त्यावरून मुलांसोबत भांडण उकरून काढले.

बराच वेळ शांत असलेल्या मुलांनी वडिलांना शांत बसण्यास सांगितले असता भगवान पाटील यांनी कपाटातून परवाना असलेले रिव्हॉल्व्हर काढून दोन्ही मुलाच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या विजयला लागल्या आणि एक गोळी सुजयच्या पोटाला चाटून गेली. या गोळीबारात जखमी झालेल्या सुजय आणि विजय या दोघांना शेजाऱ्यानी तातडीने उपचारासाठी नजिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असताना विजयचा रात्री उशिरा मृत्यू झाला.  सुजयची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भगवान पाटील यांना रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून भगवान पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version