अनिल देशमुख यांना मध्यरात्री १.०६ वाजता अटक

अनिल देशमुख यांना मध्यरात्री १.०६ वाजता अटक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तेव्हापासून ते १२ तासांपेक्षा अधिक काळ या कार्यालयात होते. रात्री त्यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. १२.१५ वाजता त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे भवितव्य काय असेल त्याची घोषणा ईडीकडून करण्यात येणार होती. अखेर त्यांना ईडीने अटक केल्याचे स्पष्ट झाले आहे. PMLA कलम 19 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार देशमुख हे ईडीच्या चौकशीला योग्य प्रतिसाद देत नव्हते.अखेर मध्यरात्री १.०६ मिनिटांनी अनिल देशमुख यांना अटक केल्याचे वृत्त रिपब्लिक टीव्हीने दाखविले. त्यांचे वार्ताहर थेट ईडी कार्यालयातून या घटनेचे वार्तांकन करत होते.

ईडीने देशमुख यांना पाचवेळा चौकशीसाठी समन्स पाठविले होते. पण या ना त्या कारणाने देशमुख यांनी त्या समन्सना उत्तर दिले नाही किंवा ते ईडीसमोर हजरही झाले नाहीत. वेगवेगळे मार्ग वापरून ईडीपासून लांब जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असल्यामुळे आपण ईडीसमोर जाणार नाही, असे ते म्हणत होते. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर तो मार्ग देशमुखांसाठी बंद झाला. मुंबई उच्च न्यायालयानेही ईडीच्या चौकशीला कुठेही रोखले नाही. त्यामुळे तो मार्गही बंद झाल्यानंतर अखेर देशमुख हे ईडीसमोर हजर झाले.

हे ही वाचा:

नवाब मलिक तुम्ही मर्द असाल तर माझ्याऐवजी देवेंद्रजींना लक्ष्य करा!

मुलुंडकर अनुभवणार सुरमयी ‘दिवाळी पहाट’

अजित पवार आणि परिवाराचे कोट्यवधींचे घोटाळे उघड

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या बायकापोरांना दिवाळी नाही का?’

 

केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने सचिन वाझेला असेच चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री साडे अकरा वाजता अटक केली होती. ईडी कडून कदाचित देशमुख यांना साडे अकरा वाजता अटक करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. शेवटी १ वाजल्यानंतर त्यांना अटक केली गेली.

दिल्लीत पाठवलेले ईडीचे मुंबई विभागाचे उपसंचालक सत्यव्रत कुमार यांना तातडीने मुंबईत बोलवण्यात आले असून सायंकाळी ७ वाजता सत्यव्रत कुमार हे ईडीच्या कार्यलयात दाखल झाले आहे. त्यांच्या मार्फतच ही चौकशी करण्यात आली. सत्यव्रत कुमार यांनीच यापूर्वी देशमुख मनी लाँडरिंग प्रकरण पूर्णपणे हाताळले होते.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

आज सकाळी जारी झालेल्या एका व्हिडिओ निवेदनात अनिल देशमुख म्हणाले होते, “माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. जेव्हा मला ईडीकडून समन्स मिळाले, तेव्हा माझ्यावर तपास यंत्रणेला सहकार्य न केल्याचा आरोप करण्यात आला. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की, जेव्हा जेव्हा मला हजर राहण्यास सांगितले गेले तेव्हा मी एजन्सीला सांगितले की, हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. मी त्यांना असेही सांगितले की मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि लवकरच सुनावणी सुरू होणार आहे.” देशमुख म्हणाले होते की पोलीस प्रमुखांच्या अंतर्गत मुकेश अंबानी सुरक्षेच्या चौकशीत काही “अक्षम्य” त्रुटी उघड झाल्या आहेत.

Exit mobile version