गुरुवारी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अंबानी स्फोटक प्रकरणात नवा खुलासा केला आहे. त्याने या प्रकरणात आता त्याचे माजी सहकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे नाव घेतले आहे. शर्मा यांनीच आपल्याला अंबानींच्या घराबाहेर ठेवण्यासाठी जिलेटीन पुरवले असा जबाब वाझे यानी एनआयएला दिला आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन ह्याची हत्या या दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या एनआयए करत आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा सहभाग असून तो सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. सचिन वाझेच्या चौकशीत रोज नवनवीन गोष्टी समोर येत असून यात आता शिवसेना उमेदवार राहिलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे नाव वाझेने घेतले आहे.
काय म्हणाला वाझे?
अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओमध्ये जिलेटीन ठेवण्याच्या कटात प्रदीप शर्मा यांचा सहभाग होता. शर्मा यांनी ३-४ मार्च रोजी गुजरात येथे जाऊन जिलेटीनच्या कांड्या आणि सिम कार्ड घेऊन आले. तसेच अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ पार्क करताना त्यावेळी प्रदीप शर्मा आणि मनसुख दोघेही उपस्थित होते असेही वाझेने आपल्या जबाबात म्हटले आहे.
वाझे याच्या या जबाबानंतर गुरुवारी एनआयएने प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावले. गुरुवारी दुपारी प्रदीप शर्मा हे चौकशीसाठी मुंबई येथील एनआयए कार्यालयात दाखल झाले. वाझे आणि शर्मा यांना समोरासमोर बसवून एनआयए त्यांची चौकशी करणार असल्याचे म्हटले जात आहे. या आधी बुधवारीही एनआयएने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची चौकशी केली.