सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला वर्ष लोटले तरी अजूनही त्याच्या मृत्यू मागचे गूढ कायम आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली, असे प्रथम दर्शनी भासत असले तरीही त्या दिवशी नेमके काय घडले? याचे उत्तर अजूनही देशासमोर आले नाही. सुशांतच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. ते प्रश्न सुशांतच्या नातेवाईकांनी उपस्थित केले, कधी माध्यमांनी उपस्थित केले, कधी कंगना रानौत सारख्या अभिनेत्रीने, कधी राजकीय नेत्यांनी तर कधी सामान्य जनतेने. पण आजही यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत.
सुशांत सिंह राजपूतच्या केसशी संबंधित आजवर स्थानिक पोलीस, एनसीबी, ईडी, सीबीआय अशा अनेक संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रानुसार तपास केला. अनेकांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी झाली. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिलादेखील ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच तिची जामिनावर सुटका झाली.
हे ही वाचा:
सुशांतसिंग : चटका लावून जाणारी आठवण
१२ वर्षानंतर नेतान्याहू सत्तेतून बाहेर
उल्हासनगर प्रकरणी बिल्डरवर महिन्याभराने गुन्हा
आज सुशांत ह्याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. तरीही ‘सुशांतला न्याय कधी मिळणार?’ हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. सुशांतच्या केसशी संबंधित सध्या ईडी, सीबीआय आणि एनसीबी अशा तीन केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. सीबीआय ही सुशांतच्या मृत्यूचा तपास करत आहे. तर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी या केसशी संबंधित मनी लॉन्डरिंगचा अँगल तपासून पाहत आहे. तर एनसीबी ही ड्रग्सशी संबंधित तपास करत आहे.
यापैकी एनसीबीने गेले अनेक महिने आपली धडक कारवाई सुरु ठेवली असून बॉलीवूडशी संबंधित अनेक ड्रग माफिया आज जेलची हवा खात आहेत. तर ईडीकडून रिया चक्रवत्री विरोधात मनी लॉन्डरिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिनी सीबीआय कडून हे जाहीर करण्यात आले आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची केस अजून बंद करण्यात आलेली नाही.
त्यामुळे सुशांत सिंह राजपूत याला न्याय मिळवून देण्यसाठी सरकारी यंत्रणा आपापल्या परीने कार्यरत असलेल्या दिसत आहेत. आता प्रतीक्षा आहे ती फक्त न्यायाची!