दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील झोपडपट्टी राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील ३ महिन्याच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैगिंग अत्याचार करून खून करणाऱ्या २४ वर्षीय तृतीयपंथीला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
जुलै २०२१ मध्ये ही घटना घडली होती, आरोपीला मुलीच्या कुटुंबीयांनी आर्थिक परिस्थितीमुळे साडी चोळी दिली नसल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केले होते.
कन्हैया उर्फ कन्नु दत्ता चौघुले (२४) असे या तृतीयपंथीचे नाव आहे. कन्हैया हा कफ परेड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टी मध्ये राहण्यास होता. त्याच परिसरात बळीत मुलीचे कुटुंब राहण्यास आहे, या कुटुंबात एप्रिल २०२१ मध्ये मुलगी जन्मली होती.८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ३ महिन्याच्या या चिमुरडीला आईच्या कुशीतून उचलून तिचे अपहरण करण्यात आले होते.
या मुलीच्या अपहरण प्रकरणी कफ परेड पोलिसांनी संशयावरून कन्हैया या तृतीयपंथीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच मुलीचे अपहरण करून तिला एका ठिकाणी पुरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. या मुलीवर लैगिंग अत्याचार करून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले होते. कफ परेड पोलिसांनी कन्हैया उर्फ कन्नु दत्ता चौगुले यांच्या विरुद्ध अपहरण, हत्या, लैंगिक अत्याचार, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पोक्सो या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.
कन्हैया उर्फ कन्नु दत्ता चौगुले हा तृतीयपंथी असून ज्या दाम्पत्याला मुले झाली त्याच्या घरी जाऊन पैसे आणि साडी चोळी मागणे व जन्मलेल्या मुलाना आशीर्वाद देणे हे काम कन्हैय्या करीत होता.
हे ही वाचा:
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश!
कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी कारागृहातील बॅरेक वाढवणार
विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प
बळीत मुलीच्या कुटुंबाकडे कन्हैया घटनेच्या काही दिवसांपूर्वी गेला होता, त्याने या कुटुंबाकडे पैसे आणि साडी चोळी मागितली परंतु कुटुंबांनी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते देण्यास नकार दिला होता. या रागातून कन्हैयाने या कुटूंबाला धडा शिकवण्यासाठी चिमुरडीचे अपहरण करून तिचा खून केला.
हा खटला सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती ए. यु .कदम यांच्या न्यायालयात सुरू होता, आरोपी विरुद्ध असलेल्या सबळ पुरावे,तांत्रिक पुरावे, साक्षीदार,फॉरेन्सिक अहवालावरून आरोपी कन्हैया विरुद्ध आरोप सिद्ध होऊन सत्र न्यायालय अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती ए. यु .कदम यांनी आरोपी कन्हैया उर्फ कन्नु दत्ता चौगुले याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.