टोरेस कंपनीच्या घोटाळ्याची शिवाजी पार्क पोलिसांना कुणकुण होती,जून महिन्यात त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स देखील बजावले होते,परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे आता शिवाजी पार्क पोलिसांनाच चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबई पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांच्या चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकारी यांची निवड केली आहे. या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर पोलीस आयुक्ताना सुपूर्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
विदेशी कंपनी टोरेस या कंपनीचा हजारो कोटींचा घोटाळा सोमवारी उघडकीस आला आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना मोजॉईनाईट खड्याची विक्री करून या खड्यात गुंतवलेल्या रकमेचा परतावा चार पटीने देण्याचे आमिष दाखवून जवळपास सव्वा लाख गुंतवणूकदारांची हजारो कोटींची फसवणूक केली आहे. या कंपनीचे मुख्य संस्थापक युक्रेन देशाचे असून डिसेंबर महिन्यात त्यांनी गुंतवणूकदारांची हजारो कोटींची माया गोळा करून पसार झाले आहे.
६ जानेवारी रोजी शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना या प्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात धक्कादायक माहिती अशी समोर आली आहे की, या घोटाळ्याची कुणकुण पोलिसांना जून २०२४ मध्येच लागली होती. शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी टोरेस कंपनीला समन्स बजावून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र पुढे काहीच कारवाई या कंपनीवर करण्यात आली नाही. जून महिन्यानंतर टोरेस कंपनी सुसाट सुटली होती व त्यांनी गुंतवणूकदाराना जास्त बोनसचे आमिष दाखवले, त्याच बरोबर गिफ्ट मध्ये आयफोन, चारचाकी मोटार इत्यादी आमिष दाखवून गुंतवणूकदार वाढविण्यास सुरू वाट केली होती.
हे ही वाचा:
हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल राहणार उपस्थित
दिल्लीतील शाळांना १२ वीच्या विद्यार्थ्याकडून बॉम्बची धमकी, चौकशीत मोठा खुलासा!
हा आहे मविआचा खरा ‘ब्येष्ट मुख्यमंत्री
बिहारच्या माजी मंत्र्यासह अनेकांवर ईडीचे छापे
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात आयकर विभागाने आणि नोव्हेंबर महिन्यात नवी मुंबई पोलिसांनी कंपनीला समन्स बजावले होते. त्यांनी देखील कुठलीही कारवाई केली नाही. शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेस कंपनीला पाठवलेल्या समन्सवर काय कारवाई केली, या बाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडले असून त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी बसविण्यात आली आहे. या चौकशीचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकारी यांच्याकडे देण्यात आला असून लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल पोलीस आयुक्त यांच्या कडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.