जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. त्रालमध्ये अतिरेकी लपल्याची खबर मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सध्या या परिसरात सर्च ऑपरेशन करण्यात आलं आहे.
दक्षिण कश्मीर जिल्ह्याच्या त्रालच्या जंगलात अतिरेकी लपल्याची जवानांना खबर मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराची घेराबंदी करून सर्च ऑपरेशन सुरू केलं. सर्च ऑपरेशन सुरू असताना अतिरेक्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. या परिसरात अजून काही अतिरेकी लपल्याची शंका असल्याने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
या आधी ३१ जुलै रोजी सकाळी सुरक्षा दलाने पुलवामा जिल्ह्यात एन्काऊंटर केलं होतं. यावेळी दोन अतिरेकी ठार झाले होते. पुलवामाच्या नागबेरन-तरसर वन क्षेत्रात सुरक्षा दलाच्या जवानांची अतिरेक्यांसोबत चकमक उडाली होती. त्यावेळी पोलीस आणि जवानांना मोठं यश मिळालं होतं.
हे ही वाचा:
दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये
भारताने बनवली जगातील पहिली डीएनए लस
पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अतिरेक्यांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सुरक्षा दलानेही जोरदार सर्च ऑपरेशन करत या अतिरेक्यांचं कंबरडं मोडलं आहे. आतापर्यंत अनेक अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. या पूर्वी कुलगामच्या अहरबल परिसरातील जंगल परिसरात एक एन्काऊंटर झाला होता. यावेळी लष्करचा टॉप कमांडर ठार झाला होता. आमिर अहमद मीर असं त्याचं नाव होतं. तो चोलांद शोपियांचा राहणारा होता. २०१७ पासून त्याच्या या परिसरात दहशतवादी कारवाया सुरू होत्या, असं सूत्रांनी सांगितलं.