जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान हुतात्मा

मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह पाच जण जखमी

जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शनिवार, २७ जुलै रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमने (बीएटी) केलेला हल्ला लष्कराने हाणून पाडला. यात एक जवान हुतात्मा झाला असून मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह पाच जण जखमी झाले आहेत. या गोळीबारात एक पाकिस्तानी दहशतवादीही मारला गेला. भारतीय सुरक्षा दलाचे जवान कामकरी भागात शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

कुपवाडा जिल्ह्यातील कामकरी भागात पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कराने शोध मोहीम राबवली होती. दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांची चाहूल लागताच त्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरवात केली. याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीदरम्यान, दहशतवादी जंगलात पळून गेल्याची शक्यता असून आता अतिरिक्त जवान पाठवून शोध घेतला जात आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाला परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यात एक जवान हुतात्मा झाला असून मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह पाच जण जखमी झाले आहेत. या गोळीबारात एक पाकिस्तानी दहशतवादीही मारला गेला.

“भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याविरुद्ध पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीमचा (BAT) हल्ला हाणून पाडला. हल्ल्यात सहभागी असलेल्या BAT टीममध्ये त्यांच्या SSG कमांडोसह पाकिस्तानी सैन्याचे नियमित सैनिक असल्याचा संशय आहे जे दहशतवादी संघटनांशी मिळून काम करतात,” अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक चकमक झाली असून त्यात अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. तर काही जवान हुतात्मा झाले आहेत. सध्या काश्मीरमध्ये लष्कर, पोलीस आणि विविध सुरक्षा दले दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई करत आहेत.

हे ही वाचा:

नवी मुंबईत इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भीती, दोघांची सुटका

गिरगावची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी ‘हिंदू मंदिर बचाव अभियाना’त सहभागी होण्याचे आवाहन

पठाणकोटमध्ये ७ संशयास्पद व्यक्ती दिसले, जम्मूमध्ये हाय अलर्ट !

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी नेमबाजांना अनमोल बिश्नोईने दिला होता खास संदेश

गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या दहशतवादी घटनांमुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेतली होती. त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा-संबंधित परिस्थिती आणि सशस्त्र दलांकडून सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवायांचा संपूर्ण आढावा देण्यात आला. तर, शुक्रवारी झालेल्या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिलमधून पाकिस्तानला दहशतवादावरून इशारा दिला आहे.

Exit mobile version