जम्मू- काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; लष्कराच्या जवानांकडून पाच दहशतवाद्यांचा खात्मा

चकमकीत दोन लष्करी जवान जखमी

जम्मू- काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; लष्कराच्या जवानांकडून पाच दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. लष्कराच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात दोन लष्कराचे जवान जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या लष्कराकडून या भागात शोध मोहीम सुरू आहे.

बुधवारी रात्री, कुलगाम जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कद्दर येथे संशयित दहशतवादी असल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर लष्कराच्या जवानांनी तातडीने शोध मोहीम हाती घेत परिसराला घेराबंदी केली. शोध मोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवादी यांच्यात संपर्क प्रस्थापित होताच गोळीबाराला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. यावेळी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सुरक्षा दलांनी सर्व परिसर रिकामा केला आहे. दरम्यान, आतापर्यंत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.

एक्स वरील एका पोस्टमध्ये, लष्कराच्या चिनार कॉर्प्सने म्हटले आहे की, “१९ डिसेंबर २०२४ रोजी, दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी कादर, कुलगाम येथे संयुक्त ऑपरेशन सुरू केले. दक्ष जवानांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या आणि त्यांना आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद आणि प्रचंड गोळीबार केला. आमच्या सैन्याने त्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले.”

हे ही वाचा..

प्रवासी बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हणतात आणि त्यांना भेटायलाही येतात, याची कीव येते!

भोजनालयात धूम्रपान : मलेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना दंड

सर्व धार्मिक स्थळे सरकारच्या नियंत्रणाखाली आणा! विशिष्ट धर्माचीच का?

यापूर्वी ३ डिसेंबर रोजी श्रीनगर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या कारवाईत जुनैद अहमद भट नावाचा दहशतवादी मारला गेला होता. पोलिसांनी सांगितले की, भटचा जम्मू आणि काश्मीरमधील गगनगीर, गंदरबल आणि इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या हत्येमध्ये सहभाग होता. दरम्यान, अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १९ डिसेंबर रोजी दिल्लीत एका उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीवर विशेष भर देऊन गंभीर सुरक्षा मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version