जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल, पोलिसांची संयुक्त शोध मोहीम

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात बुधवार, २६ जून रोजी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, डोडा जिल्ह्यात ११ आणि १२ जून रोजी झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांनंतर लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) तसेच पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम हाती घेतली आहे. या शोध आणि घेराबंदीच्या मोहिमेदरम्यान सकाळी ९.५० च्या सुमारास गंडोह भागातील बजाड गावात दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्या चकमक सुरु झाली. यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

सुरक्षा दलांच्या मदतीने पोलिसांनी सिनू पंचायत गावात शोध मोहीम सुरु केली आहे. या गावात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला आहे. याला सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यात तीन दहशतवादी ठार झाले असून अद्याप या ठिकाणी गोळीबार सुरूच आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

कॉलेजमध्ये हिजाब हवा म्हणणाऱ्या मुलींची याचिका फेटाळली

ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक देशहिताची विधेयके झाली संमत!

ओम बिर्ला नवे लोकसभा अध्यक्ष!

क्रिकेटमधील DLS पद्धतीचे निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

यापूर्वी ११ जून रोजी दहशतवाद्यांनी चत्तरगल्ला येथे एका चेक पोस्टवर हल्ला केला होता. त्यात सहा सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. तर, दुसऱ्या दिवशी गंडोह भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस जखमी झाले होते. यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे.

Exit mobile version