शेअर्स मार्केटमुळे कर्जबाजारी झालेल्या कर्मचाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात दरोडा पडल्याचा बनाव केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी मात्र या कर्मचाऱ्याचा बनाव २४ तासांत समोर आणला असून या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी ही घटना मुलुंड येथे एका सीएच्या कार्यालयात ही घटना घडली होती.
सुमित वाडेकर असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.सुमित हा मागील काही वर्षांपासून मुलुंड पश्चिमेतील ‘सिद्धार्थ शहा असोसिएट’ या कंपनीत नोकरी करीत होता. सुमित हा विश्वासू कर्मचारी असल्यामुळे त्याच्यावर जबाबदारीचे कामे सोपविण्यात येत होती. कंपनीच्या मालकाने सुमित याला २० लाख रुपयांची रक्कम घेण्यासाठी एका क्लाइन्ट (ग्राहक) कडे शनिवारी सकाळी पाठवले होते, सुमितने तेथून रोकड घेऊन दुसऱ्या क्लाइन्टला त्यातील साडेसहा लाख रक्कम दिले.
तेथून तो कार्यालयाकडे आला. दरम्यान कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांना सुमित हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यांनी मालक सिद्धार्थ यांना कळविले. मालकाने तात्काळ कार्यालयात धाव घेऊन सुमितला मुलुंड जनरल रुग्णालय या ठिकाणी आणून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. सुमितकडे चौकशी केली असता कोणी तरी पाठीमागून येवुन माझ्या नाकावर रुमाल लावला व माझ्याजवळील बॅग खेचून पळ काढला आणि मी बेशुद्ध झालो असे सांगितले. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेजमुळे बनाव उघड
मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीरे यांनी गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि.संतोष कांबळे, पो.उपनिरीक्षक पूजा धाकतोडे यांचे पथक तयार केले होते. या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही टीव्ही कॅमरे, तसेच कार्यालयातील कॅमेराचे फुटेज तपासले असता, सुमित याच्यावरच पोलिसांचा संशय बळावला. आणखी काही फुटेज बघितले असता त्यात चोरी करण्यासाठी आलेली व्यक्ती सुमितसोबत एका ठिकाणी गप्पा मारताना दिसली, याचा अर्थ सुमित याच्या ओळखीची व्यक्ती असल्याचे कळताच पोलीस पथकाने सुमितची उलट तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मित्राच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले, पोलिसांनी याप्रकरणी सुमित आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.
कर्ज फेडण्यासाठी केली चोरी
सुमित याला शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा नाद होता, त्यासाठी त्याने अनेकांकडून कर्ज काढले होते. मात्र शेअर्स मार्केट मध्ये त्याचे नुकसान होऊन तो कर्जबाजारी झाला होता, हे कर्ज फेडण्यासाठी त्याने हा बनाव रचला होता अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.