एल्विश यादव अटकेत नाही किंवा फरारीही नाही

राजस्थानमध्ये पोलिसांनी केली चौकशी, पण नंतर सोडून दिले

एल्विश यादव अटकेत नाही किंवा फरारीही नाही

युट्युबर आणि बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता एल्विश यादव सध्या चर्चेत असून त्याचे नाव सर्पविष विकत असल्याच्या प्रकरणात घेतले गेले, त्याचा पोलिस शोध घेत आहेत, तो पोलिसांना गुंगारा देत आहे, अशा बातम्या समोर आल्या पण एल्विशला फरारी वगैरे घोषित करण्यात आलेले नाही तसेच पोलिसही त्याच्या मागावर नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

 

राजस्थानात आपल्या मित्रांसमवेत गाडीने जात असताना पोलिसांनी त्याला अडवले पण त्याची चौकशी करून १५ मिनिटांनी त्याला सोडण्यात आले. त्याला अटक करण्यात आलेली नाही किंवा त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. राजस्थान पोलिसांनी सांगितले की, एल्विश यादवला काही काळासाठी थांबविण्यात आले पण नंतर त्याला सोडण्यात आले.

 

यासंदर्भात राजस्थानच्या कोटाचे डीएसपी (भ्रष्टाचारविरोधी पथक) कैलाश चंद यांनी सांगितले की, एक गाडी चेकपोस्टला थांबविण्यात आली. जेव्हा त्या गाडीतील लोकांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यातील एकाचे नाव एल्विश यादव असल्याचे कळले. त्याचे नाव नोएडातील प्रकरणात घेतले गेल्याचे माहीत असल्यामुळे पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. पण त्या पोलिसांनी सांगितले की, चौकशी सुरू आहे पण एल्विश हा फरारी नाही किंवा तो पाहिजे या कॅटेगरीतला आरोपीही नाही. जर त्याची चौकशी करावी लागली तर त्याला बोलावण्यात येईल. त्यामुळे राजस्थान पोलिसांनी त्याला सोडले.

 

राजस्थान पोलिसांनी असेही सांगितले की, त्याच्या गाडीत कोणतेही आक्षेपार्ह असे काही सापडले नाही. त्याला कोणत्याही पोलिस ठाण्यात नेण्यात आले नाही किंवा सर्पविषाची तस्करी केल्याप्रकरणाशी संबंधित प्रश्नही विचारण्यात आले नाहीत. त्यामुळे एल्विशला अटक करण्यात आली आहे, तो राजस्थान पोलिसांच्या ताब्यात आहे, या बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले.

हे ही वाचा:

आयएएस बनण्याची गोष्ट… सहा गोळ्या लागूनही जिवंत!

कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील

नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचा अपघात

बुडत्याचा पाय खोलात, आता ड्रग्ज प्रकरणीही आरोप

३ नोव्हेंबरला बिग बॉस ओटीटी २चा विजेता ठरलेला एल्विश याने भाजपाच्या खासदार मनेका गांधी यांच्यावर टीका केली. आपल्याविरोधात सर्वविष पुरवत असल्याचे जे आरोप करण्यात आले त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. एल्विशने हेही स्पष्ट केले की, सापांसोबतचे जे व्हीडिओ दाखविण्यात येत आहेत ते ५-६ महिन्यांपूर्वीचे आहेत. एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी ते साप वापरले गेले होते.

 

नोएड़ा येथे झालेल्या एका रेव्ह पार्टीसंदर्भात यादवचे नाव पुढे आले होते. त्याबाबत पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यात जयकरण, राहुल तितुनाथ, नारायण, रवीनाथ यांचा समावेश आहे.

 

Exit mobile version