‘बिग बॉस ओटीटी’ विजेता आणि युट्युबर एल्विश यादव याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एल्विश यादव याच्यावर तस्करी तसेच रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एल्विश यादव याच्यासोबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व आरोपानंतर एल्विश यादव याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नोएडा पोलिसांनी सेक्टर ४९ मध्ये छापा टाकून पाच जणांना अटक केली. शिवाय पोलिसांनी येथून पाच कोब्रा साप देखील जप्त केले असून यासोबतच सापांचे विष देखील पोलिसांच्या हाती लागले. दरम्यान, या कारवाईवेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादव याचे नाव समोर आले असून त्या अनुषंगाने पोलिसांनी एल्विश यादव याच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे, अशी माहिती समोर आली होती.
यावर एल्विश यादव याने व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, “मी आज सकाळी झोपेमधून उठल्यावर या सर्व धक्कादायक गोष्टी बघितल्या आहेत. मला अटक केली; एल्विश यादव हा ड्रग्जसह पकडला गेला असल्याचे देखील सांगितले जात आहे. पण, अशा गोष्टींमध्ये एक टक्का देखील सत्य नाही. माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप हे चुकीचे आहेत. यामध्ये काहीच सत्य नाही. मुळात मी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी आणि पोलिस प्रशासनाला विनंती करतो की, या प्रकरणात माझी एक टक्का देखील चूक असेल तर मी सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहे.”
हे ही वाचा:
पाकिस्तानकडून अफगाणिस्तानी निर्वासितांवर क्रूर अत्याचार!
मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं
ललित पाटीलसह त्याच्या १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई
नोएडामध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले. धक्कादायक म्हणजे या पार्टीसाठी थेट विदेशातून मुली बोलावण्यात आल्या. फक्त इतकेच नाही तर थेट येथे पाच कोब्रा आणि विविध प्रजातीच्या सापांचे विष देखील मिळाले आहे. इतर पाच जणांना या प्रकरणात पोलिसांकडून अटकही करण्यात आली. यात एल्विश याचे नाव समोर आले होते.