मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळून आला आहे. या हिंसाचारात आठ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका कलाकाराचाही समावेश आहे. बिष्णुपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यात गेल्या ७२ तासांत कुकी आणि मैतेईं समाजांमध्ये हिंसाचार पेटला. यावेळी झालेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले असून, १८ जण जखमी झाले आहेत.
मणिपूरमध्ये ठार झालेल्या आठ जणांमध्ये गीतकारासह दोन जवानांचा समावेश आहे. गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी बिष्णुपूर जिल्ह्यातील खोइरंकटक आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील चिंगफेई आणि खौसाबुंग भागांत दोन गटांमध्ये जोरदार गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मणिपूरच्या बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत कुकी आणि मैतैई गटामध्ये भीषण संघर्ष सुरू होता. खोइरेंटक, खौसाबुंग आणि चिंगफेई या भागांमध्ये दोन्ही गटातकडून गोळीबार करण्यात आला. त्यात आठ लोकांचा मृत्यू झाला.
संपूर्ण हिंसाचारात आतापर्यंत शांत असलेल्या खोइरेंटक या भागात गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना समोर येत असल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळं आता केंद्र तसेच राज्य सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली जात आहे.
हे ही वाचा:
एक देश, एक निवडणूक विधेयक संसदेत येणार?
मध्य प्रदेशातील शाळेत हिंदू मुलींच्या हिजाब घातलेल्या फोटोंमुळे खळबळ
‘मी परत येईन’: भाजपच्या पोस्टरवर पंतप्रधान ‘टर्मिनेटर’च्या रूपात
युवकांसाठी तू प्रेरणास्थान आहेस!
दरम्यान, पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी बंडखोर गट रिव्होल्यूशनरी पीपल्स फ्रंट (आरपीएफ), नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम इसाक मुईवाच्या प्रत्येकी एका सक्रिय बंडखोरांना आणि कांगलेईपाक कम्युनिस्ट पक्षाच्या दोन हस्तकांना अटक केली होती. मे महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये ६५ हजारांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. हिंसाचारात १६५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ६ हजार जण जखमी झाले आहेत. आगीच्या पाच हजार घटना घडल्या आहेत.