छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये शनिवार, १ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. देशातील नक्षलग्रस्त भागात सध्या नक्षलविरोधी मोहिमेला वेग आला आहे. ही मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली असून सातत्याने शोधमोहीम राबवण्यात येत आहे. कारवाईत मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांचा खात्मा केला जात आहे. नक्षलवाद्यांची ठिकाणे उध्वस्त करून शस्त्रसाठाही जप्त केला जात आहे.
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी चकमक झाली. सकाळी ८.३० च्या सुमारास झालेल्या चकमकीत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झाली आहे. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. घटनास्थळी अजूनही शोध मोहीम सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार, अजूनही या भागात अधूनमधून गोळीबार सुरू आहे. जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि त्यांची विशेष युनिट कोब्राचे सैनिक या कारवाईत सहभागी आहेत. पश्चिम बस्तर विभागात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी ही कारवाई सुरू करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वीचं झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात झारखंड पोलीस, 209 COBRA बटालियन, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या मोहिमेदरम्यान एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला होता. तर, काही जण जखमी झाले होते. याशिवाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून दोन इन्सास रायफल जप्त करण्यात आल्या होत्या.
हे ही वाचा :
१४० कोटी भारतीयांची स्वप्ने पूर्ण करणारा अर्थसंकल्प
देशाला आर्थिक महासत्ता, विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प!
आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा अर्थसंकल्प!
अर्थमंत्र्यांनी परिधान केलेल्या साडीतून झाला मधुबनी कलेचा सन्मान!
दरम्यान, केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याची शपथ घेतली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये अजेंडा आजतक येथे आपल्या भाषणात गृहमंत्री अमित शाह म्हणाले, छत्तीसगडमधील फक्त दोन जिल्हे नक्षल प्रभावाखाली आहेत. आणि ते ३१ मार्च २०२३ पर्यंत मुक्त केले जातील. तर, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव म्हणाले की, नक्षलवाद आता शेवटचा श्वास घेत असून लवकरच बस्तर पूर्णपणे नक्षलमुक्त होईल.